सोन्याच्या दरवाढीला ब्रेक; सराफा बाजारात भाव स्थिर, खरेदीदारांना दिलासा

मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढत असलेल्या सोन्याच्या किमतींना आज तात्पुरता ब्रेक लागला आहे. लग्नसराईमुळे राज्यात सोन्याची मागणी वाढलेली असतानाच, आज सराफा बाजार उघडताच सोन्याच्या दरात कोणताही बदल झालेला नसल्याचे दिसून आले. त्यामुळे खरेदीदार आणि गुंतवणूकदारांच्या नजरा आजच्या दरांकडे लागल्या होत्या.
आंतरराष्ट्रीय बाजारातील घडामोडी, कमकुवत डॉलर आणि यूएस फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर कपातीची अपेक्षा यामुळे मागील दिवसांत सोन्याला तेजी मिळाली होती. मात्र goodreturns संकेतस्थळानुसार, सोमवारचे दर आजही कायम राहिले आहेत. वाढत्या महागाईच्या काळात भाव स्थिर राहिल्याने ग्राहकांना काहीसा दिलासा मिळाला आहे.
आज भारतात २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति ग्रॅम १६,१९५ रुपये, २२ कॅरेट सोन्याचा दर १४,८४५ रुपये, तर १८ कॅरेट सोन्याचा दर १२,१४६ रुपये प्रति ग्रॅम इतका आहे. विशेष म्हणजे २४ आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात एक रुपयाचीही वाढ झालेली नाही.
गेल्या काही दिवसांत सोन्याचे दर ऐतिहासिक उच्चांकाच्या जवळ पोहोचले होते. त्यामुळे आज भाव न वाढल्याने दागिने खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा ठरू शकतो. मात्र हे दर जीएसटी (GST) आणि मेकिंग चार्जेस वगळून असल्याची नोंद घ्यावी, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.



