BhandaraLatest News

भावड महादेव मूर्ती विटंबनेचा छडा;आरोपी अखेर पोलिसांच्या जाळ्यात!

भंडारा: भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील भावड गावात भगवान महादेवाच्या मूर्तीची विटंबना करून संपूर्ण जिल्हा हादरवणाऱ्या नराधमाला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. अड्याळ पोलीस आणि स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) अत्यंत शिताफीने तपास करत आरोपी ज्ञानेश्वर शामदेव चिचमलकर (वय ४२, रा. भावड) याला भंडारा बसस्थानक परिसरातून बेड्या ठोकल्या आहेत.

नेमकी घटना काय होती?

१६ ते १७ जानेवारी २०२६ च्या मध्यरात्री भावड येथील प्राचीन महादेव मंदिरातील मूर्तीचे दोन्ही हात आणि तोंड तोडून विटंबना करण्यात आली होती. १८ जानेवारीच्या सकाळी ही धक्कादायक घटना उघडकीस येताच भावड गावातील ग्रामस्थांमध्ये संतापाचा उद्रेक झाला. या घटनेमुळे हिंदू बांधवांच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्याने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आरोपीला तात्काळ अटक करावी, या मागणीसाठी ग्रामस्थ आक्रमक झाले होते.

पोलीस प्रशासनाची गतीने हालचाल

घटनेचे गांभीर्य ओळखून जिल्हा पोलीस अधीक्षकांनी तातडीने चौकशीचे आदेश दिले. अड्याळ पोलीस स्टेशनमध्ये कलम २९८ भारतीय न्याय संहिता अंतर्गत गुन्हा दाखल करून, तपासासाठी अड्याळ पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या सात विशेष पथकांची निर्मिती करण्यात आली.

असा लागला तपासाचा छडा

तपासादरम्यान पोलिसांना गावातीलच ज्ञानेश्वर चिचमलकर याच्यावर संशय आला. घटनेच्या दिवसापासून तो गावातून बेपत्ता असल्याने पोलिसांचा संशय अधिक बळावला. तांत्रिक विश्लेषण (Technical Analysis) आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने पोलिसांनी त्याचा मागोवा घेतला. अखेर तो भंडारा बसस्थानक परिसरात असल्याची खात्रीशीर माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले.

आरोपीने दिली गुन्ह्याची कबुली

पोलिसी खाक्या दाखवताच ज्ञानेश्वरने भावड येथील महादेव मूर्तीची विटंबना केल्याची कबुली दिली. ही कारवाई पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरीत्या पार पडली. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून, त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी भावड परिसरातील नागरिकांकडून केली जात आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button