वर्षाच्या अखेरच्या दिवशी निसर्गाची अनोखी भेट

पेंच व्याघ्र प्रकल्पात एकाच दिवशी वाघ T-98 आणि T-108 चे दर्शन; पर्यटकांसाठी अविस्मरणीय सफारी वर्षाच्या अखेरच्या दिवशी निसर्गाने पर्यटकांना एक अविस्मरणीय अनुभव दिला. पेंच व्याघ्र प्रकल्पातील चोरबाहुली वनपरिक्षेत्रात जंगलातील प्रमुख वाघ T-98 आणि T-108 हे दोन्ही वाघ एकाच दिवशी पर्यटकांसमोर अवतरल्याने सफारीसाठी आलेल्या पर्यटकांचा आनंद द्विगुणित झाला.
थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
३१ डिसेंबर रोजी चोरबाहुली गेटवरून सफारीसाठी गेलेल्या पर्यटकांना दुर्मिळ असा अनुभव मिळाला. याच सफारीदरम्यान वाघ T-108 ने सांभराची शिकार केल्यानंतर भक्ष्य खातानाचे थरारक दृश्य पर्यटकांनी प्रत्यक्ष पाहिले. जंगलातील नैसर्गिक जीवनचक्राचा हा क्षण अनेक पर्यटकांच्या कॅमेऱ्यात कैद झाला असून, ही सफारी वर्षातील सर्वात संस्मरणीय ठरल्याचं पर्यटकांनी सांगितलं.
पर्यटकांचा अनुभव: “आतापर्यंतची सर्वोत्तम सफारी”
नागपूर येथील जरीपटका परिसरातील हरकिरत सिंग कलसी यांनी ही सफारी आपल्या आतापर्यंतच्या सर्व अनुभवांपैकी सर्वोत्तम असल्याची भावना व्यक्त केली. तसेच जिप्सी चालक सिद्धार्थ नारनवरे आणि गाईड अंकित निकुरे यांच्या मार्गदर्शनाचे त्यांनी विशेष कौतुक केले.
चोरबाहुली गेटकडे वाढता पर्यटन ओढा
चोरबाहुली गेट परिसरातील समृद्ध जैवविविधता, वाघांचे नैसर्गिक वर्तन आणि सुरक्षित सफारी व्यवस्थेमुळे पर्यटकांचा ओढा दिवसेंदिवस वाढत आहे. येथे मिळणाऱ्या नियमित वाघदर्शनामुळे पेंच व्याघ्र प्रकल्प पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे उभा राहत आहे.
सौंदर्यीकरणाचे काम वेगात
दरम्यान, उपसंचालक अक्षय गजभिये आणि सहाय्यक वनसंरक्षक पूजा लिंबगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी जयेश तायडे यांच्या नेतृत्वात चोरबाहुली गेटच्या सौंदर्यीकरणाचे काम वेगाने सुरू आहे. भविष्यात पर्यटकांसाठी सर्व आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती वनविभागाने दिली आहे.
निसर्गाशी थेट संवाद साधणारा अनुभव
वर्षाच्या अखेरच्या दिवशी लाभलेले हे वाघदर्शन पर्यटकांसाठी केवळ एक सफारी न ठरता, निसर्गाशी थेट संवाद साधणारा आणि कायम स्मरणात राहणारा अनुभव ठरल्याचं पर्यटकांकडून सांगितलं जात आहे.



