वर्ष संपतंय… पण शेतकऱ्यांच्या वेदना कायम

2025 यवतमाळच्या बळीराजासाठी ‘काळरात्र’; 354 शेतकऱ्यांनी संपवलं जीवन वर्ष बदलण्याची वेळ आली आहे… नव्या वर्षाच्या स्वागताची तयारी सुरू आहे. मात्र यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 2025 हे वर्ष वेदनांनी भरलेलं ठरलं आहे. अतिवृष्टी, नापिकी, वाढतं कर्ज आणि अपुरी शासकीय मदत या सगळ्यांच्या विळख्यात सापडून तब्बल 354 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक शासकीय नोंद समोर आली आहे.
एका बाजूला नवीन वर्षाची चाहूल, तर दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू — अशी विदारक स्थिती यवतमाळ जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
अतिवृष्टीचा कहर; लाखो हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त
जून ते सप्टेंबर 2025 या कालावधीत निसर्गाने रौद्र रूप धारण केलं. अवकाळी व अतिवृष्टीमुळे 6 लाख 64 हजार 595.86 हेक्टर क्षेत्रावरील पिके पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. याचा थेट फटका 5 लाख 35 हजार 636 शेतकऱ्यांना बसला.
खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच अनेक शेतकऱ्यांनी सोन्याचे दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून पेरणी केली होती. मात्र पावसाच्या तडाख्याने शेतकऱ्यांच्या हातात काहीच उरलं नाही.
नुकसान भरपाई अपुरी; शेतकऱ्यांचा आक्रोश
नुकसान भरपाईसाठी शासनाने 638 कोटी 15 लाख रुपयांची तरतूद केल्याचा दावा केला आहे. यातील 99 टक्के रक्कम वितरित झाल्याचं सांगितलं जात असलं, तरी प्रत्यक्षात मिळालेली मदत अत्यंत तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये तीव्र आहे.
“ही मदत जखमेवर मीठ चोळणारी आहे,” असा आरोप शेतकरी व शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. पिके हातातून गेली, उत्पन्न शून्यावर आलं आणि कर्जाचा डोंगर दिवसेंदिवस वाढत गेला.
354 आत्महत्या; जिल्हा हादरवणारी आकडेवारी
नैराश्यातून बाहेर पडण्याचा मार्ग न सापडल्याने 2025 या एकाच वर्षात 354 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची शासकीय नोंद यवतमाळ जिल्ह्याला हादरवणारी आहे. शेतकरी आत्महत्यांची राजधानी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या जिल्ह्यात परिस्थिती अधिकच गंभीर बनली आहे.
यंदा कापसाचे पीक अर्ध्यावर आले, उत्पादन खर्च दुप्पट झाला, मात्र मिळालेली मदत अत्यंत अपुरी ठरल्याचं शेतकरी नेते सांगत आहेत.
आशेचा नांगर अजूनही हातात
वेदना कितीही मोठ्या असल्या, तरी बळीराजा हार मानत नाही. वर्ष संपत असताना शेतकऱ्यांच्या जखमा ताज्याच आहेत, पण तरीही नवीन वर्षात निसर्ग साथ देईल आणि चांगले दिवस येतील, या आशेवर शेतकरी पुन्हा एकदा नांगराची मूठ हातात घेण्यासाठी सज्ज झाला आहे.



