अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींना उमेदवारी; एकाच कुटुंबातील तिघांना AB फॉर्म

पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतलेल्या निर्णयामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या आणि सध्या तुरुंगात असलेल्या उमेदवारांना थेट उमेदवारी देण्यात आल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. विशेष म्हणजे एक नव्हे, तर एकाच कुटुंबातील तब्बल तिघांना राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आले आहेत.
आंदेकर कुटुंबाला राष्ट्रवादीची उमेदवारी
आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपी असलेले आंदेकर कुटुंब अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे. नातवाच्या हत्येच्या आरोपाखाली सध्या तुरुंगात असलेले बंडू उर्फ सूर्यकांत राणोजी आंदेकर यांनी काही दिवसांपूर्वी कडक पोलीस बंदोबस्तात उमेदवारी अर्ज दाखल केला होता. घोषणाबाजी करत त्यांनी अर्ज दाखल केल्याने त्या वेळीही वाद निर्माण झाला होता.
यानंतर बंडू आंदेकर कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार, याकडे लक्ष लागले होते. अखेर ते अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आता बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी आंदेकर आणि सून सोनाली आंदेकर यांनाही राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आल्याचे समोर आले आहे.
तुरुंगातूनच निवडणूक लढवणार उमेदवार
हत्येच्या गुन्ह्यात तुरुंगात असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर या दोघी प्रभाग क्रमांक २३ मधून निवडणूक लढवणार आहेत. या दोघीही सध्या न्यायालयीन कोठडीत असून, वकिलांमार्फत एबी फॉर्म भरून पुण्यातील भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत.
गजा मारणेच्या पत्नीलाही राष्ट्रवादीची उमेदवारी
या प्रकरणासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीने आणखी एक वादग्रस्त निर्णय घेतला आहे. पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे यांची पत्नी जयश्री मारणे यांनाही राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आली आहे. प्रभाग क्रमांक १०, बावधन येथून जयश्री मारणे यांना एबी फॉर्म देण्यात आला असून त्यांनी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कोर्टाची निवडणूक लढण्यास परवानगी
दरम्यान, आंदेकर कुटुंबाने निवडणूक लढण्याची परवानगी मिळावी यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला होता. सत्र न्यायालय व विशेष मोक्का न्यायालयाने निवडणूक लढवण्यास परवानगी दिली आहे. मात्र, कोर्टाने स्पष्ट अटी घातल्या असून कोणतीही मिरवणूक, प्रचार फेरी, घोषणाबाजी किंवा सार्वजनिक भाषणे करता येणार नाहीत, अशी ताकीद दिली आहे.
बंडू आंदेकरची भावजय लक्ष्मी आंदेकर, सून सोनाली आंदेकर तसेच मुलगी वृंदावनी वाडेकर या सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत.
आयुष कोमकर हत्या प्रकरणाची पार्श्वभूमी
वनराज आंदेकरच्या हत्येनंतर पुण्यातील दोन टोळ्यांमधील संघर्ष वाढला होता. याच वैमनस्यातून ५ सप्टेंबर २०२५ रोजी आयुष कोमकरची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात पोलिसांनी १५ जणांना अटक केली होती. यामध्ये बंडू आंदेकरसह कुटुंबातील नऊ सदस्यांचा समावेश आहे. अटक झालेल्या आरोपींपैकी १२ जण पोलिस कोठडीत असून उर्वरित न्यायालयीन कोठडीत आहेत.
राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया
हत्येच्या गुन्ह्यात आरोपी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार टीका होण्याची शक्यता आहे. पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घेतलेल्या या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, या प्रकरणाचा निवडणूक निकालांवर काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



