अमरावती महापालिका निवडणूक: प्रभाग 14 मधून शिवसेना उबाठा गटाकडून शक्तीप्रदर्शन करत नामांकन दाखल

अमरावती महानगरपालिकेच्या निवडणूक प्रक्रियेला वेग आला असून, नामांकन अर्ज दाखल करण्याचा महत्त्वाचा टप्पा सध्या सुरू आहे. नामांकनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक असताना, 29 डिसेंबर रोजी शहरातील झोन कार्यालयांमध्ये उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट–बुधवारा येथून शिवसेना उबाठा गटाच्या अधिकृत उमेदवारांनी शक्तीप्रदर्शन करत नामांकन अर्ज दाखल केले.
अमरावती महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आता चांगलाच रंग भरू लागला आहे. प्रभाग क्रमांक 14 जवाहर गेट–बुधवारा येथून अ, ब, क, ड वर्गवारीतील ड वर्गातून प्रवीण वसंतराव हरमकर, तर ब वर्गातून विशाखा प्रवीण हरमकर यांनी शिवसेना उबाठा गटाच्या वतीने अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल केला.
नामांकन अर्ज दाखल करताना झोन कार्यालय परिसरात शिवसैनिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. यावेळी शिवसेनेच्या जोरदार घोषणा, पक्षाचे झेंडे आणि उत्साही वातावरणामुळे संपूर्ण परिसरात राजकीय चैतन्य निर्माण झाले होते. या शक्तीप्रदर्शनातून शिवसेना उबाठा गटाने या प्रभागात पूर्ण ताकदीने निवडणूक लढवण्याचा निर्धार स्पष्ट केल्याचे दिसून आले.
दरम्यान, नामांकन प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात अमरावतीतील राजकीय वातावरण तापले असून, विविध राजकीय पक्षांकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. येत्या दोन दिवसांत आणखी किती उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



