जेजुरीतील गडावरील आगीसंदर्भात खळबळजनक खुलासा; 8 महिन्यांपूर्वीच तक्रार करूनही कारवाई नाही

अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या खंडेरायाच्या जेजुरी गडावर रविवारी दुपारी घडलेल्या भीषण आगीच्या घटनेने संपूर्ण राज्यात खळबळ उडवली आहे. दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण सुरू असतानाच अचानक आगीचा प्रचंड भडका उडाला. या दुर्घटनेत नवनिर्वाचित दोन नगरसेवकांसह तब्बल 16 जण भाजले असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती आहे.
या घटनेनंतर पुन्हा एकदा जेजुरीतील भेसळयुक्त भंडाऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला असून, ही आग नेमकी कशामुळे लागली, यासाठी कोण जबाबदार आहे, याबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.
विजयोत्सवात घडली दुर्घटना
जेजुरी नगर परिषदेच्या मतमोजणीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने निर्विवाद सत्ता मिळवल्यानंतर विजयाचा जल्लोष सुरू होता. याच दरम्यान जेजुरी गडाच्या पहिल्या पायरीजवळ खंडेरायाच्या चरणी भंडाऱ्याची उधळण केली जात असताना अचानक आगीचा भडका उडाला. काही क्षणांतच आनंदाचा जल्लोष भीती आणि आरडाओरडीत बदलला.
8 महिन्यांपूर्वीच इशारा देण्यात आला होता
या घटनेला खळबळजनक वळण मिळाले असून, मार्तंड देव संस्थांचे माजी विश्वस्त शिवराज झगडे यांनी तब्बल आठ महिन्यांपूर्वीच जेजुरीत उधळल्या जाणाऱ्या भंडाऱ्यात भेसळ होत असल्याचा आरोप करत तक्रार केली होती. भेसळयुक्त भंडाऱ्यामुळे भाविकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला होता.
यासंदर्भात त्यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांना निवेदन दिले होते. मात्र, त्यावर आजपर्यंत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप आता पुढे येत आहे.
भेसळयुक्त भंडाऱ्याचा संशय अधिक बळावला
जेजुरीचा खंडेराया हा अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. लाखो भाविक दरवर्षी “येळकोट येळकोट जय मल्हार”च्या जयघोषात भंडारा आणि खोबऱ्याची उधळण करतात. मात्र जेजुरीत येणाऱ्या भंडाऱ्यात निर्मिती करणाऱ्या कंपन्यांकडून भेसळ केली जात असावी, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
धक्कादायक बाब म्हणजे हा भंडारा नेमका कोठून येतो, याची स्पष्ट माहिती उपलब्ध नाही. स्थानिक व्यापारीही यावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत.
चौकशीची मागणी, देवस्थानचे पाठबळ
जर ही दुर्घटना भेसळयुक्त भंडाऱ्यामुळेच झाली असेल, तर अन्न व औषध प्रशासन विभागाने तातडीने तपासणी करावी, अशी मागणी होत आहे. शासन जेवढी कठोर कारवाई करेल, त्याला श्री मार्तंड देवस्थान पूर्ण पाठबळ देईल, असे मुख्य विश्वस्त मंगेश घोणे यांनी स्पष्ट केले आहे.
सुप्रिया सुळेंनीही मागितली कारवाई
या घटनेवरून बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही तीव्र प्रतिक्रिया दिली आहे.
“जेजुरी गडाच्या पायथ्याशी मतमोजणीनंतरच्या जल्लोषात भेसळयुक्त भंडारा उधळल्याने आगीचा भडका उडून ही दुर्घटना घडली. यात विजयी उमेदवारांसह अनेकजण गंभीर भाजले गेले. ही घटना अत्यंत दुःखद आणि दुर्दैवी आहे,” असे त्यांनी आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये म्हटले आहे. तसेच प्रशासनाच्या सातत्याने संपर्कात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
दुर्लक्षाचा फटका भाविकांना
दरम्यान, जेजुरी परिसरात भेसळयुक्त भंडारा विक्री होत असल्याच्या तक्रारी यापूर्वीही स्थानिकांनी शासनाकडे केल्या होत्या. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाल्यानेच आज ही दुर्दैवी घटना घडल्याचा आरोप होत आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेले सर्वजण लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी सर्वत्र प्रार्थना केली जात असून, या घटनेची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.



