पिंपळगाव बु. येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचा ७७वा पुण्यतिथी सप्ताह भक्तिभावात सुरू

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ७७व्या पुण्यतिथीनिमित्त पिंपळगाव बु. येथे ‘संगीतमय ग्रामगीता तत्वज्ञान सप्ताह’ मोठ्या भक्तीभावात सुरू आहे. श्री गुरुदेव सर्वधर्म स्मृती प्रार्थना मंदिरात रोज प्रवचन, भजन, हरिपाठ आणि कीर्तनांच्या निनादाने संपूर्ण परिसरात अध्यात्मिक वातावरण पसरले आहे.
या सप्ताहाचे प्रमुख प्रवचनकार ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज केसामडे असून ते तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतील आत्मिक बोध, सामाजिक एकात्मता आणि ग्रामीण विकासाचा संदेश प्रभावीपणे ग्रामस्थांपर्यंत पोहोचवत आहेत. महिला, युवक आणि वयोवृद्ध मोठ्या संख्येने या कार्यक्रमात सहभागी होत आहेत.
सप्ताहाच्या आयोजनासाठी सेवाभावी समिती सदस्यांनी उत्कृष्ट नियोजन केले असून ग्रामस्थांचा उत्साह या आध्यात्मिक सोहळ्याला आणखी उजाळा देत आहे. २ डिसेंबर रोजी होणाऱ्या सप्ताह समारोपासाठी गावात विशेष उत्साह आहे. यावेळी आमदार सई डहाके यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत, तसेच युवक मंडळी अहोरात्र सेवा देत आहेत, ज्यामुळे तुकडोजी महाराजांच्या विचारांचा प्रसार आणि ग्रामगीतेचा संदेश सर्वांपर्यंत पोहोचेल.
सर्वसामान्यांचा सहभाग आणि भक्तिभावामुळे ‘संगीतमय ग्रामगीता तत्वज्ञान सप्ताह’ केवळ कार्यक्रम नाही, तर आध्यात्मिक जागृतीचा पावन सोहळा ठरत आहे.



