श्रीलंकेत मुसळधार पावसाचा कहर : भूस्खलन-पुरामुळे 20 हून अधिक मृत, 14 जण बेपत्ता

श्रीलंकेत गेल्या आठवड्यापासून सुरू असलेल्या अविरत पावसामुळे भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. मुसळधार पावसामुळे झालेले भूस्खलन आणि पूर यामुळे मृतांची संख्या वाढत जाऊन 31 वर पोहोचली असून 14 जण बेपत्ता आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
अतिवृष्टीमुळे देशातील अनेक भागांतील प्रवासी गाड्या तात्पुरत्या थांबवण्यात आल्या आहेत, तर काही प्रमुख रस्त्यांवरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापन केंद्राने सांगितले की, एकट्या मध्य प्रांतातील चहाच्या मळ्यांसाठी प्रसिद्ध बडुल्ला आणि नुवरा एलिया या डोंगराळ जिल्ह्यांमध्ये तब्बल 18 लोकांचा मृत्यू झाला आहे. हे भाग राजधानी कोलंबोपासून जवळपास 300 किलोमीटर अंतरावर आहेत.
स्थानिक प्रशासन, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन दलाकडून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू असून आतापर्यंत शेकडो नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. अनेक घरे, रस्ते आणि पायाभूत सुविधा गंभीरपणे बाधित झाल्याने परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे.
हवामान खात्याने पुढील काही दिवस पाऊस कायम राहण्याचा इशारा दिल्याने प्रशासन सतर्क आहे.



