अमरावतीतील आदिवासी वस्तीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण; अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचा संतप्त आरोप

अमरावती विभागातील आदिवासी वस्तीगृहांमध्ये विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्ज्याचा गंभीर आरोप अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने केला आहे.
परिषदेच्या पत्रकार परिषदेत सांगितले की, वस्तीगृहातील अन्नपुरवठ्याची जबाबदारी असलेल्या अन्नपूर्णा कॅटरर्सकडून विद्यार्थ्यांना दर्जाहीन जेवण पुरवले जाते. गेल्या दोन महिन्यांपासून अंडी आणि फळांचा पुरवठा पूर्णपणे थांबवण्यात आला असल्याचे देखील परिषदेने सांगितले.
परिषदेने असा दावा केला की, हक्काचे जेवण मागणाऱ्या विद्यार्थ्यांना जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या.
अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने तातडीची चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि विद्यार्थ्यांना पौष्टिक व दर्जेदार जेवण उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे.
परिषदेने स्पष्ट इशारा दिला की, जर मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर पुढील महिन्यात अप्पर आयुक्त कार्यालयावर सर्व आदिवासी विद्यार्थी मोर्चा काढणार आहेत.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या हक्कांसंबंधी आणि अन्नपुरवठ्याच्या गुणवत्तेच्या प्रश्नावर पुन्हा एकदा लक्ष वेधले गेले आहे.



