माहूरमध्ये क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी; भव्य मिरवणुकीने शहर दुमदुमले

माहूर : आदिवासी समाजाच्या अभिमानाचे प्रतीक आणि क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त माहूर शहरात मोठ्या उत्साहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. विविध सामाजिक व आदिवासी संघटनांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, १६ नोव्हेंबर रोजी भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्राची भव्य मिरवणूक शहरातून काढण्यात आली.
मिरवणुकीची सुरुवात राष्ट्रीय महामार्गावरील बिरसा मुंडा चौकातून झाली. पारंपरिक पोशाखातील आदिवासी बांधवांनी मोरपिस धारण करून ढोल-ताशांच्या तालावर सादर केलेल्या नृत्यामुळे मिरवणुकीला वेगळेच उत्साहपूर्ण वातावरण लाभले. तरुण, महिला आणि विविध समाजघटक मोठ्या संख्येने सहभागी झाल्याने मिरवणूक शहरभर रंगतदार बनली.
मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, जुनी जगदंबा हायस्कूल परिसर, भगवान गौतम बुद्ध पुतळा, चक्रधर नगर, हुसैनी चौक, राजे मधुकर देशमुख वाडा, ब्राह्मण गल्ली, महाराणा प्रताप चौक, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम चौक या मार्गावरून पुढे जात शहरभर फिरली. कार्यक्रमाच्या शेवटी भगवान बिरसा मुंडा चौकात तैलचित्राचे उत्साहात विसर्जन करण्यात आले.
या प्रसंगी नगरसेवक प्रतिनिधी देविदास सीडाम, शामराव कुमरे, रूपेश कोवे, किसन कुमरे, पवन कनाके, कालिदास नैताम, विकास टेकाम, पंकज वाटोळकर, राजू कोवे, राम सोयाम, कोठेकर, नामदेव सोयाम, सोनू तोडसाम, दिलीप आडे, राजू आडे, सुधाकर चांदेकर, शुभम वेट्टी, गजानन कुरसंगे, प्रकाश पेंदोर, बंटी तोडसाम, शुभम सीडाम तसेच मोठ्या संख्येने महिला व समाज बांधव उपस्थित होते.
भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त शहरभर निर्माण झालेल्या उत्साहामुळे माहूरमध्ये ऐक्य, परंपरा आणि आदिवासी संस्कृतीचा सुंदर संगम पाहायला मिळाला.



