गो. से. विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय व स्व. ॲड. शंकररावजी बोबडे ज्ञानमंदिर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शारदा महोत्सव २०२५’ उत्साहात संपन्न

खामगाव – गो. से. विज्ञान, कला आणि वाणिज्य महाविद्यालय, खामगाव अंतर्गत महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समिती आणि स्व. ॲड. शंकररावजी बोबडे ज्ञानमंदिर, खामगाव यांच्या संयुक्त विद्यमाने ‘शारदा महोत्सव २०२५’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या महोत्सवाचे आयोजन महाविद्यालयाच्या परिसरात करण्यात आले होते.
महिला सक्षमीकरण व उद्योजकता विकास समितीच्या माध्यमातून महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी दरवर्षी विविध उपक्रम आयोजित केले जातात. महिलांचा सामाजिक विकास, सामाजिक बांधिलकी वाढवणे तसेच दैनंदिन जीवनातील ताणतणावातून काही काळ आनंदाचे क्षण मिळावेत, या हेतूने या वर्षीचा ‘शारदा महोत्सव’ आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी गो. से. महाविद्यालयातील शंकररावजी बोबडे सभागृहात सरस्वती मातेची मूर्ती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. डी. एस. तळवणकर आणि स्व. ॲड. शंकररावजी बोबडे ज्ञानमंदिरच्या प्राचार्या ज्योती खांडे यांच्या हस्ते विधिवत स्थापन करण्यात आली. त्याच दिवशी ज्ञानमंदिरातही मा. सौ. श्रद्धाताई बोबडे (सदस्य, वि. शि. प्र. मंडळ, खामगाव) यांच्या हस्ते शारदा देवीची मूर्ती स्थापन करण्यात आली.
मूर्ती स्थापनेनंतर महाविद्यालयातील युवा महोत्सवाच्या चमूने विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. डी. एस. तळवणकर यांनी सर्वांना शुभेच्छा देत पुढील काळात अशा सांस्कृतिक आणि महिलांसाठी प्रेरणादायी उपक्रम सातत्याने आयोजित करण्याचे आवाहन केले.
या महोत्सवानिमित्त गरबा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. गो. से. महाविद्यालय तसेच एस. बी. ज्ञानमंदिरातील सर्व महिला प्राध्यापक आणि शिक्षिका यांनी उत्साहाने सहभाग घेत गरब्याचा आनंद लुटला. महोत्सवाच्या समारोपानंतर शारदा देवीच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात आले आणि प्रसादाचे वितरण करण्यात आले.
या संपूर्ण उपक्रमाचे प्रेरणास्थान मा. सौ. श्रद्धाताई बोबडे होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. रेश्मा मारवाडी यांनी केले. शारदा स्तवन प्रा. वर्षा कोकाटे यांनी सादर केले, तर आभार प्रदर्शन प्रा. पूनम तिवारी यांनी मानले.
कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडण्यासाठी समन्वयक डॉ. रेश्मा मारवाडी, प्राचार्या ज्योती खांडे, प्रा. संगीता वायचाल, डॉ. नीता बोचे, सौ. स्नेहल नरवडे, सौ. साक्षी दळवे, प्रा. पूनम तिवारी, प्रा. रोहिणी धरमकर, प्रा. कोमल काळे, कु. भाग्यश्री सापधारे तसेच गो. से. महाविद्यालय आणि एस. बी. ज्ञानमंदिरातील सर्व महिला प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षिका यांनी मनापासून सहकार्य केले.
महिला सहभाग, सृजनशीलता आणि सांस्कृतिक एकात्मतेचा संगम ठरलेला हा ‘शारदा महोत्सव २०२५’ खामगावमध्ये उत्साहात आणि आनंदात संपन्न झाला.



