Latest NewsMaharashtra

नदीच्या अचानक वाढलेल्या प्रवाहात वाहून गेल्या माय-लेकी

लातूर जिल्ह्यातील जळकोट तालुक्यातील मरसांगवी येथे तिरू नदीच्या प्रवाहात वाहून गेल्याने मायलेकीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.
मृतांमध्ये कौशल्या अजय वाघमारे, वय ३५ वर्षे आणि रुक्मिणी अजय वाघमारे, वय १४ वर्षे यांचा समावेश आहे.
ही दोघी मायलेकी मजुरीसाठी मरीबा वाघमारे यांच्या शेतात कापूस वेचण्यासाठी जात होत्या. शेत नदीपलीकडे असल्याने त्या नदी ओलांडत होत्या.
सकाळी सुमारे अकराच्या सुमारास नदीत पाणी कमी असल्याने त्यांनी प्रवाह पार करण्याचा प्रयत्न केला. परंतु तिरू प्रकल्पातून अचानक पाणी सोडल्याने नदीचा प्रवाह प्रचंड वाढला आणि त्या दोघीही प्रवाहात वाहून गेल्या.
गावकऱ्यांनी तातडीने धाव घेऊन शोधकार्य सुरू केले, मात्र तोपर्यंत दोघींचाही मृत्यू झाला होता.
स्थानिक सरपंच रवी गोरखे आणि चेअरमन उमाकांत इमडे यांनी माहिती दिली की, तिरू प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला असून दररोज गेट उघडून पाणी सोडले जात आहे. अचानक सोडलेल्या पाण्यामुळे प्रवाह वाढून ही दुर्घटना झाली.
गावकऱ्यांचा संताप व्यक्त होत असून, त्यांनी पुन्हा एकदा पुलाच्या मागणीचा मुद्दा उचलून धरला आहे.
मरसांगवी गाव तिरू नदीकाठावर असून दरवेळी पूर आल्यास गावात पाणी शिरते.
अनेक वर्षांपासून नागरिक पूल उभारणीची मागणी करत आहेत, मात्र अद्याप काहीच झालेले नाही.
या वर्षी अतिवृष्टी आणि पूरामुळे जळकोट तालुक्यातील सहा नागरिकांचा मृत्यू झाला आहे.
पूल नसणे, कमी उंचीचे रस्ते आणि अचानक पाणी सोडल्याने या घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
स्थानिक प्रशासनाने या गंभीर परिस्थितीकडे लक्ष देऊन तातडीने उपाययोजना कराव्यात — अशी मागणी होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button