बडनेऱ्यात कार्तिकी एकादशीचा भक्तिमय सोहळा!

बडनेरा येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर देवस्थानच्या वतीने आयोजित कार्तिकी एकादशी सोहळा तीन दिवसांच्या धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांनी रंगला.
या सोहळ्याची सुरुवात दिनांक १ नोव्हेंबर रोजी भव्य पालखी दिंडीने झाली. माधान येथील प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज यांच्या दिंडी पथकातील माऊलींनी पदपावलीचे अप्रतिम दर्शन घडवत भाविकांची मने जिंकली. या प्रसंगी परिसरातील घरांवर सुंदर विद्युत रोषणाई करण्यात आली आणि दारोदारी पालखी पूजनाचा कार्यक्रमही पार पडला. दुसऱ्या दिवशी सायंकाळी “कानडा राजा पंढरीचा” या भक्तीमय संगीत रजनीचे आयोजन करण्यात आले.
सचिन गुडे, राजकुमार निंभोरकर, निशाताई वानखडे आणि जी. खानोदे या कलाकारांनी भक्तिगीतांच्या माध्यमातून उपस्थितांना भक्तीचा अनोखा अनुभव दिला.
या कार्यक्रमाला परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. तीन नोव्हेंबर रोजी महाप्रसादाच्या आयोजनाने या सोहळ्याची सांगता झाली. शेकडो नागरिकांनी महाप्रसादाचा लाभ घेत भक्तीभावाने कार्यक्रमाची सांगता केली. या सर्व कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिर देवस्थानच्या सर्व विश्वस्तांनी अथक परिश्रम घेतले.



