Latest NewsMaharashtra Politics

कर्जमाफीवर आज निर्णायक बैठक: बच्चू कडू आणि मुख्यमंत्री आमनेसामने

शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करून त्यांचा सातबारा कोरा करण्याच्या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपूरमध्ये सुरू असलेल्या आंदोलनावर तोडगा निघण्याची चिन्हे दिसत आहेत. बच्चू कडू यांनी राज्य सरकारशी चर्चा करण्यासाठी मुंबईत येण्यास होकार दिला असून, आज संध्याकाळी ७ वाजता मुंबईतील सह्याद्री अतिथिगृहावर आंदोलकांच्या मागण्यांबाबत महत्त्वाची बैठक पार पडणार आहे.

या उच्चस्तरीय बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे तिघेही उपस्थित राहणार आहेत. आंदोलकांच्या वतीने बच्चू कडू, राजू शेट्टी, महादेव जानकर आणि अजित नवले हे नेते सरकारसोबत वाटाघाटी करतील. बैठकीसाठी मुख्य सचिवांसह विविध विभागांतील ३० हून अधिक वरिष्ठ अधिकारी देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत आजच्या बैठकीत महत्त्वाचा आणि कदाचित अंतिम निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बैठकीत बच्चू कडू यांनी सरकारला दिलेले निवेदन तसेच ७ एप्रिल रोजी झालेल्या मागील बैठकीतील निर्णयांवरील कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे.
मुंबईला रवाना होण्यापूर्वी बच्चू कडू यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “सर्व शेतकरी नेते एकत्र आले आहेत, हेच या आंदोलनाचे सर्वात मोठे यश आहे. या एकजुटीमुळे शेतकऱ्यांना आत्मविश्वास मिळतो आणि ते आत्महत्येचा विचार करत नाहीत,” असे ते म्हणाले.

आज संध्याकाळी होणाऱ्या बैठकीत प्रामुख्याने सरसकट कर्जमाफी, पंजाबच्या धर्तीवर शेतमाल खरेदी केंद्रे, २० टक्के बोनस आणि हमीभाव या प्रमुख मागण्यांवर चर्चा होणार आहे. बच्चू कडू यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, जर सरकारने आजच्या बैठकीत शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढला नाही, तर मुंबईवरून नागपूरला परतल्यावर आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाईल. आजच्या बैठकीकडे राज्यातील शेतकरी आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button