सोशल मीडियावरून वाढलेली ओळख ठरली घातक; पत्नीने प्रियकर व मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या”

रायगड, १६ ऑक्टोबर २०२५ – रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथे एक धक्कादायक हत्या प्रकरण समोर आले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू झालेल्या ओळखीचे रुपांतर विवाहबाह्य संबंधात झाले आणि याच नात्यामुळे एका पतीचा जीव गेला. पत्नीने प्रियकर आणि मैत्रिणीच्या मदतीने पतीची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.
मयत व्यक्तीचे नाव कृष्णा नामदेव खंडवी (वय २३, रा. पेण, जि. रायगड) असून, त्याची पत्नी दिपाली हिची ओळख सोशल मीडियावर उमेश सदु महाकाळ याच्याशी झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले आणि दोघांमध्ये विवाहबाह्य संबंध निर्माण झाले.
दरम्यान, पती कृष्णा हा त्यांच्या संबंधात अडथळा ठरत असल्याचे लक्षात येताच, दिपाली आणि उमेशने कृष्णाची हत्या करण्याचा कट रचला. या कटात दिपालीच्या मैत्रिणी सुप्रिया चौधरी हिचीही मदत घेण्यात आली.
सुप्रियाने सोशल मीडियावर बनावट खाते तयार करून कृष्णाशी संपर्क साधला व त्याला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. नंतर कृष्णाला पेण येथून नागोठणे येथे बोलावण्यात आले. तिथे वरसगाव येथील डोंगराळ, निर्जन भागात त्याची हत्या करण्यात आली.
हत्या केल्यानंतर मृतदेहाची ओळख पटू नये यासाठी आरोपींनी मृतदेहावर केमिकल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच कृष्णाचा मोबाईल फोनही फोडून नष्ट करण्यात आला.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत नागोठणे पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून, अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे रायगड जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.



