वर्षावास समाप्ती कार्यक्रमाला खा. बळवंत वानखडे व आ. रवी राणा उपस्थित

बडनेरा येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे अध्यक्ष मनोज गजभिये यांच्या निवासस्थानी वर्षावास समाप्ती निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला खासदार बळवंत वानखडे, आमदार रवी राणा तसेच शहरातील विविध बौद्ध संस्था, मंडळे आणि गणमान्य नागरिक उपस्थित होते. आषाढ पौर्णिमेपासून अश्विन पौर्णिमेपर्यंत चालणाऱ्या या तीन महिन्यांच्या वर्षावास कालावधीत तथागत बुद्धांनी सांगितलेल्या मानवहिताच्या धम्माचा प्रचार भिक्खू संघाद्वारे करण्यात येतो. या कालावधीत मनोज गजभिये यांनी शहरातील विविध बुद्धविहारांमध्ये फळांचे वाटप करून समाजसेवा केली.
वर्षावास समाप्ती प्रसंगी आयोजित ग्रंथवाचन, पूजा आणि भोजनदान कार्यक्रमात खासदार बळवंत वानखडे आणि आमदार रवी राणा यांनी स्वतः उपस्थित राहून बुद्धांच्या शिकवणीवर मार्गदर्शन केले. त्यांनी म्हटले की, “बुद्धांचे विचार हे आजच्या समाजात शांतता, समता आणि बंधुभावाचे अधिष्ठान आहेत.”
कार्यक्रमाला एमजी ग्रुप, यूएम ग्रुप, भारतीय बौद्ध महासभा शाखा आठवडी बाजार बडनेरा, आणि विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनोज गजभिये यांच्या पुढाकाराने हा वर्षावास कार्यक्रम सलग बाराव्या वर्षी यशस्वीपणे पार पडला.
तसेच वर्षावास समाप्ती निमित्त बडनेरा नवी वस्ती परिसरातील पंचशील बुद्ध विहारात देखील खासदार बळवंत वानखडे व आमदार रवी राणा यांनी सदिच्छा भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला. या प्रसंगी पंचशील मंडळाचे अध्यक्ष अजय भालेराव तसेच सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
संपूर्ण कार्यक्रमात बुद्ध धम्म, सामाजिक एकता आणि मानवी मूल्यांचा प्रसार करण्याचा संदेश देण्यात आला.



