रावेर तालुक्यातील वाघोड गावात पिण्याच्या पाण्यातून आढळली पक्ष्यांची पिसे

रावेर तालुक्यातील वाघोड गावात गेल्या काही दिवसांपासून नळाच्या पाण्यातून मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची पिसे येत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. हा प्रकार प्राथमिक आरोग्य केंद्राच्या पूर्वेकडील प्लॉट भागात उघडकीस आला. स्थानिक नागरिक सुनिल महाजन यांनी त्यांच्या मोटर पंपातून पाणी घेतले असता, पाण्यात पिसे असल्याचे लक्षात आले. त्यांनी मोटरचा पंप उघडून पाहिला असता आत मोठ्या प्रमाणात पक्ष्यांची पिसे अडकलेली दिसली. या घटनेमुळे गावकऱ्यांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील महिला पल्लवी महाजन यांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे सविस्तर चौकशी करून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या घटनेनंतर ग्रामपंचायतीकडून पाणीपुरवठा थांबवण्यात आल्याचे समजते, मात्र नागरिकांनी प्रशासनावर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. नागरिकांचे म्हणणे आहे की, “जर असं पाणी लोकांच्या घरात पोहोचत असेल, तर गावात आजारपण पसरायला वेळ लागणार नाही. या प्रकरणाची आरोग्य विभाग व जलपुरवठा विभागाने तत्काळ चौकशी करावी, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.



