अमरावती महापालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी नेहरू मैदानाची निवड – श्री अंबादेवी व एकविरा देवी विकास आराखड्याला तत्वतः मान्यता

अमरावती : अमरावती शहराच्या शहरी विकासाच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलण्यात आले असून, अमरावती महानगरपालिकेची नवीन प्रशासकीय इमारत नेहरू मैदान येथील खुल्या जागेत उभारण्याचा निर्णय आज पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत घेण्यात आला. यासोबतच शहरातील धार्मिक व सांस्कृतिक दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या श्री अंबादेवी-एकविरादेवी विकास आराखड्याला देखील तत्वतः मान्यता देण्यात आली आहे.
या बैठकीला आमदार श्री. संजय खोडके व आमदार सौ. सुलभाताई खोडके यांच्या अध्यक्षतेखाली अमरावती महानगरपालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. बैठकीस महापालिका आयुक्त सौम्या शर्मा चांडक, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त योगेश पिठे, डॉ. मेघना वासनकर, नरेंद्र वानखडे, तसेच विविध विभागप्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.
शहरी विकास व नागरी सुविधा यावर भर
आमदार सौ. सुलभाताई खोडके यांनी स्पष्टपणे सांगितले की, “अमरावती शहरात झपाट्याने शहरीकरण होत असून, त्याला पूरक अशा नागरी सुविधा देणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करत नागरी सुविधांची तातडीने अंमलबजावणी करावी.”
नेहरू मैदानावर नव्या प्रशासकीय इमारतीचा प्रस्ताव
महापालिकेची प्रशासकीय इमारत सध्याच्या गरजेनुसार अपुरी पडत असून, नवीन प्रशस्त इमारत उभारण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. या संदर्भात तज्ञ आर्किटेक्टकडून स्ट्रक्चरल डिझाईन व आराखडा लवकरच सादर करण्यात येणार असून, नेहरू मैदानावरील खुल्या जागेवरच ही इमारत उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच जिल्हाधिकाऱ्यांकडे अधिकृत प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
अंबादेवी-एकविरा देवी विकास आराखड्याला मान्यता
शहरातील प्रमुख तीर्थस्थळे श्री अंबादेवी व एकविरा देवी मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टीने तयार करण्यात आलेल्या आराखड्याला तत्वतः मान्यता देण्यात आली. या मंदिरांना ‘अ’ दर्जाचे तीर्थक्षेत्र घोषित करण्यासाठी प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आल्याचे आयुक्तांनी सांगितले.
स्वच्छता, आरोग्य व नागरी अडचणींवर ठोस चर्चा
बैठकीत स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, अतिक्रमण, बांधकाम, शिक्षण, प्रकाश व्यवस्था, पशुवैद्यकीय सेवा, रस्ते व तलाव सौंदर्यीकरण अशा अनेक विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.
स्वच्छतेबाबत यंत्रबळ व मनुष्यबळ कमी असल्याचे लक्षात घेता इतर शहरांच्या कार्यपद्धतींचा अभ्यास करण्याचे निर्देश.
प्रमाणबद्ध मालमत्ता कर वसुलीसाठी सुधारणा व तक्रारींचे निराकरण तातडीने करण्याचे आदेश.
शाळांमध्ये डिजिटल बोर्ड, क्रीडांगणे, CCTV आणि भौतिक सुविधा वाढवण्यावर भर.
उद्यान व शहर सौंदर्यीकरण
शहरातील चौकांचे सौंदर्यीकरण, दुभाजकांमध्ये हरित झोन, शिवटेकडी व वडाळी तलावांचा पर्यटनदृष्ट्या विकास करण्याचे नियोजन करण्यात येणार आहे. उद्यान विभागासाठी यांत्रिक साधनांची आवश्यकता लक्षात घेऊन वृक्षप्राधिकरणातून साधने उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.
हॉकर्स झोन व अतिक्रमण नियंत्रण
शहरात नियोजित हॉकर्स झोन निर्माण करण्याचा प्रस्ताव, होर्डिंग धोरण, अतिक्रमण निर्मूलन व भुयारी गटार योजना या बाबतही धोरणात्मक निर्णय घेण्यावर भर देण्यात आला.
आमदारांचे आश्वासन
“लोकप्रतिनिधी म्हणून आम्ही प्रशासनासोबत आहोत. शहराचा विकास, नागरी सोयी-सुविधा व स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने ठोस कार्यवाही करावी,” असे स्पष्ट आश्वासन आमदार संजय खोडके व सुलभाताई खोडके यांनी दिले.
या बैठकीच्या माध्यमातून शहराच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक ठोस निर्णय घेण्यात आले असून, अमरावतीच्या प्रगतीला चालना देणारे हे निर्णय लवकरच प्रत्यक्षात उतरतील, अशी अपेक्षा आहे.



