गोळीबार करणाऱ्या आरोपींची पोलिसांनी काढली वरात

निफाड — नाशिक जिल्ह्यातील शांत शहर, पण रविवारी रात्री मात्र गोळीबाराने हादरलं! रात्रीचे नऊ वाजले होते, शहर शांत होतं. पण अचानक तीन गोळ्यांचे आवाज घुमले… आणि क्षणात संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या वैरातून सिध्दार्थ मनोहर साळवे याच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या. हा हल्ला पूर्णपणे नियोजनपूर्वक करण्यात आला होता. आरोपींमध्ये — महेश ढगे, विजय शिंदे, विशाल केदळे, पुर्वी राज जाधव, आयुष्य भावसार आणि सिध्दार्थ साळवे यांचा समावेश आहे. या टोळीने गावठी पिस्तुलातून सलग तीन गोळ्या झाडल्या. गोळीबारानंतर आरोपी फरार झाले, मात्र पोलिसांनी तत्काळ नाकेबंदी करून सापळा रचला. स्थानिक गुन्हा शाखेचे रविंद्र मगर, निफाड पोलिस ठाण्याचे निरीक्षक गणेश गुरव
आणि हवालदार अनिल शेरेकर यांच्या पथकाने अवघ्या काही तासांत सर्व आरोपींना अटक केली! पोलिसांनी आरोपींकडून गावठी बंदूक, मोबाईल, पेन ड्राईव्ह आणि कॉल रेकॉर्डिंग जप्त केलं आहे. आरोपींविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 109, 61(2), 351(2), 352 तसेच आर्म् अॅक्ट 3/25 आणि 5/27 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अटक झाल्यानंतर पोलिसांनी एक अनोखा निर्णय घेतला – आरोपींना निफाडच्या रस्त्यांवरून वरात काढत नागरिकांना दाखवण्यात आलं की “कायद्याचा हात लांब आहे, गुन्हेगारांना माफी नाही!”
नागरिकांनी पोलिस कारवाईचे स्वागत केलं असून “निफाड पुन्हा सुरक्षित होईल” अशी आशा व्यक्त केली आहे.
तथापि, शहरातील वाढती गुन्हेगारी आणि बिनधास्त टोळ्या पोलिसांसाठी मोठं आव्हान बनल्या आहेत.
या घटनेने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केला आहे — “निफाडचं काय चाललंय? गुन्हेगारीचा राक्षस इतका बिनधास्त का झाला आहे?”



