कार पार्क करताना ४ वर्षाच्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर – ही हृदयद्रावक घटना पारडी परिसरातील सोनबाजी नगर, भंडारा रोड येथे घडली. चार वर्षांचा कान्हा राहुल देशमुख घरासमोरील रेतीवर खेळत होता. तेवढ्यात नीलेश ज्ञानेश्वर सतीबावणे (वय ३५, रा. सोनबाजी नगर, जुना पारडी) हा कार घेऊन आला. घराच्या बाजूला कार पार्क करताना त्याने मागे पाहण्याचे भान न राखता गाडी चालवली आणि ती थेट कान्हाच्या अंगावरून गेली. कान्हाच्या किंकाळ्यांमुळे परिसरातील नागरिकांनी धाव घेतली आणि त्याला तातडीने पारडीतील खाजगी रुग्णालयात दाखल केलं. मात्र, उपचारादरम्यान रविवारी त्याचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण देशमुख कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मृत कान्हाच्या काका विशाल देशमुख यांच्या तक्रारीवरून आरोपी चालक नीलेश सतीबावणे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना केवळ निष्काळजीपणाचं प्रतीक नसून, वाहन चालवताना आवश्यक ती काळजी न घेतल्यास किती मोठा अनर्थ होऊ शकतो, याचा जिवंत उदाहरण आहे.



