नागपुरात दुर्दैवी घटना: वीज पडून 17 वर्षीय तरुणीचा मृत्यू

नागपुर – ही हृदयद्रावक घटना नागपूर जिल्ह्यातील रामटेक पोलीस स्टेशन हद्दीतील निमखेडा गावात घडली. 13 सप्टेंबर रोजी दुपारी सव्वा चार वाजताच्या सुमारास निहारिका संजय बिच्चूमल ही 17 वर्षीय तरुणी इतर महिलांसोबत शेतात धानाचे निंदन करत होती. निहारिका मूळची मध्यप्रदेशातील शिवनी जिल्ह्यातील कुरई येथील रहिवासी होती आणि ती कामासाठी देवलापार वडंबा परिसरात आली होती.
अचानक, आकाशात विजांचा कडकडाट सुरू झाला आणि याच वेळी एक वीज थेट निहारिकाच्या अंगावर पडली. या दुर्घटनेत तिचा जागीच मृत्यू झाला. ही बातमी गावात वाऱ्यासारखी पसरली आणि तात्काळ रामटेक पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिला जाणार आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.



