नागपूरमध्ये बनावट दह्याचा पर्दाफाश, 4,432 किलो दही जप्त

नागपूर – सकाळची वेळ होती, नागपूरच्या दही बाजारात नेहमीप्रमाणे लगबग सुरू होती. त्याचवेळी, अन्न व औषध विभागाची टीम एका गुप्त माहितीच्या आधारे सकाळी 6 वाजल्यापासूनच तिथे लक्ष ठेवून होती. साधारण 8 ते 8:30 वाजण्याच्या सुमारास एक गाडी बाजारात शिरली. टीमने तत्काळ ती गाडी थांबवली आणि तिची तपासणी केली.
गाडीत एकूण 277 डब्यांमध्ये 4,432 किलो दही भरलेलं होतं. तपासणीत असं लक्षात आलं की, हे दही जबलपूरच्या राजकुमार गुलशन केसरवानी डेअरीतून आलं होतं. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, ज्या डब्यांमध्ये हे दही ठेवण्यात आलं होतं, त्यापैकी अनेक डब्यांवर गंज चढलेला होता आणि साठवणुकीच्या नियमांचं (Storage Condition) अजिबात पालन केलेलं नव्हतं.
अन्न व औषध विभागाने जागेवरच दहीचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेल्या सुमारे 1 लाख 77 हजार रुपये किमतीच्या या संपूर्ण दह्याचा साठा डंपिंग यार्डमध्ये नष्ट केला जाईल. या प्रकरणी आता पुढील तपास सुरू आहे. ही कारवाई दाखवून देते की काही लोक सामान्य नागरिकांच्या आरोग्याशी कसा खेळ खेळत आहेत.



