शिवापुर शेतशिवारात दहा फूट अजगर

शिवापुर : अकोल्याजवळील शिवापुर येथे आज सकाळी १० वाजताच्या सुमारास गावकऱ्यांना अचानक दहा फूट लांबीचा अजगर दिसून आला. परमेश्वर ढोरे यांनी तात्काळ सर्पमित्र तथा मानद वन्यजीव रक्षक बाळ काळणे यांना कळवले. बाळ काळणे व सर्पमित्र संतोष वाकोडे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. गवताच्या रंगाशी साम्य असल्यामुळे अजगर शोधणे कठीण होतं, पण अनुभवाच्या जोरावर काळणे यांनी सावधगिरी बाळगत अजगर पकडला. संतोष वाकोडे यांनीही या मोहिमेत मोलाची मदत केली. अजगराला सुरक्षितपणे पोत्यात टाकण्यात आले. गावकऱ्यांनी सांगितले की गेल्या पन्नास वर्षात प्रथमच इतका मोठा अजगर त्यांच्या शेतशिवारात दिसला. पुर आणि पावसामुळे जंगलातून नाल्याच्या पाण्याबरोबर हे अजगर शेतशिवारात येतात. बाळ काळणे यांनी गावकऱ्यांना अजगराचं महत्व समजावून सांगितलं. त्यांनी सांगितलं की अजगर माकडे, हरिण आणि रानडुकरांची संख्या नियंत्रित ठेवतो आणि तो स्वतःहून मानवावर हल्ला करत नाही.
अजगर दिसल्यास गावकऱ्यांनी घाबरून न जाता वनविभाग किंवा सर्पमित्रांना कळवावं, यामुळे अजगर सुरक्षितपणे जंगलात सोडता येतो.
वन्यजीव वाचवणे हे प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य असल्याचं त्यांनी नमूद केलं. बाळ काळणे यांनी आतापर्यंत तब्बल पासष्टच्या वर अजगर सुरक्षित पकडून वनविभागाच्या मदतीने जंगलात सोडले आहेत. आर. एफ. ओ. विश्वास थोरात, वनपाल गजानन गायकवाड आणि रेस्क्यू इंचार्ज गजानन इंगळे यांच्या उपस्थितीत हा अजगर सुरक्षित स्थळी सोडण्यात आला.



