“PUC नसेल तर इंधन नाही!” – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा मोठा निर्णय, वाहनचालकांमध्ये खळबळ

मुंबई : महाराष्ट्रात इंधन भरण्यासाठी आता प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (PUC) सक्तीचे होणार आहे! “नो पीयूसी – नो फ्युएल” या महत्त्वाकांक्षी मोहिमेची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली असून, लवकरच राज्यभरातील प्रत्येक पेट्रोल पंपावर या आदेशाची सक्तीने अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील लाखो वाहनचालकांमध्ये खळबळ उडाली आहे.
PUC नसेल, तर पेट्रोल-डिझेल नाही!
परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, “प्रत्येक वाहनाकडे वैध PUC असणे आता बंधनकारक आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यापूर्वी सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे वाहन क्रमांक स्कॅन केला जाईल. PUC वैध नसल्यास त्या वाहनाला इंधन मिळणार नाही.”
‘ऑन-द-स्पॉट’ PUC सर्टिफिकेटची सोय
वाहनचालकांची गैरसोय होऊ नये म्हणून प्रत्येक पेट्रोल पंपावर तातडीने PUC काढण्याची व्यवस्था उपलब्ध करून दिली जाईल. यामध्ये युनिक आयडेंटिटी (UID) असलेले प्रमाणपत्र दिले जाईल, जे वेळोवेळी तपासले जाऊ शकते.
अवैध PUC साखळीवर कारवाई
अनेक ठिकाणी बनावट PUC सर्टिफिकेट काढणारी टोळी सक्रिय आहे. या संदर्भात परिवहन मंत्री सरनाईक यांनी परिवहन विभागाला विशेष मोहिम राबवण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी स्पष्ट केलं की, “अवैध प्रमाणपत्र निर्मिती पूर्णतः थांबवणे हा आमचा प्राथमिक उद्देश आहे.”
प्रदूषण रोखण्यासाठी कठोर पावलं
“भविष्यातील पिढीला प्रदूषणमुक्त पर्यावरण देण्यासाठी आताची पिढी काही निर्बंध झेलायला तयार हवी. वैध PUC असलेली वाहने रस्त्यावर असतील, तरच आपण प्रदूषण रोखू शकतो,”
– प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री
बैठक का घेण्यात आली?
परिवहन विभागात आयोजित बैठकीत मंत्री सरनाईक यांनी:
PUC चाचणी केंद्रांची साखळी तयार करण्याबाबत चर्चा
पेट्रोल पंपांवर ‘नो PUC – नो फ्युएल’ अंमलबजावणीबाबत निर्देश
वाहन विक्री शोरूम आणि गॅरेजमध्ये PUC सर्टिफिकेट देण्याची योजना
अवैध PUC विरोधात कारवाईबाबत सूचना
परिवहन भवनातील अग्निसुरक्षा यंत्रणेचा आढावा
वाहनचालकांसाठी महत्त्वाचा सल्ला
तुमचं PUC प्रमाणपत्र अद्ययावत आहे का हे तपासा.
तारीख संपली असल्यास तत्काळ वैध प्रमाणपत्र घ्या.
बनावट सर्टिफिकेट काढण्यापासून टाळा – कारवाई होऊ शकते.
इंधन भरतानाही तुमच्या कागदपत्रांची तयारी ठेवा.



