छत्रपती संभाजीनगर राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खिळे ठोकले

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमधील राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा एकदा असा प्रकार घडला आहे ज्यामुळे पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दौलताबाद पोलीस स्टेशनच्या हद्दीत, मागील दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या घटनेसारखेच, पुन्हा एकदा रस्त्यावर खिळे ठोकण्यात आले आहेत. याचा परिणाम म्हणून अनेक अपघातांचे आणि लूटमारीचे प्रकार वाढले आहेत. नागरिक भीतीच्या छायेखाली जगत आहेत. विशेषतः रात्रीच्या वेळी प्रवास करणे धोक्याचे बनले आहे.
याच मार्गावर बेकायदेशीर वेश्याव्यवसायाचा धंदाही खुलेआम सुरू आहे, असे स्थानिकांनी सांगितले आहे. या महिलांना कोणाचे संरक्षण मिळत आहे, असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे. पोलीस प्रशासनाने यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. जर पोलीसच या गुन्हेगारीला पाठीशी घालत असतील, तर सामान्य नागरिकांनी सुरक्षिततेची अपेक्षा कोणाकडून करायची? प्रशासन या गंभीर समस्येवर कधी लक्ष देणार, हाच प्रश्न सध्या चर्चेत आहे.



