Latest NewsMaharashtra

“चहापेक्षा किटली गरम” रोहित पवारांचा टोला; अजित पवारांच्या समर्थनार्थ जोरदार प्रतिक्रिया

मुंबई : कुर्डुवाडी (जि. सोलापूर) येथील अवैध मुरूम उत्खनन प्रकरणात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा महिला आयपीएस अधिकाऱ्यांना दिलेल्या कथित धमकीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यापासून राज्यात राजकीय वादळ उठले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी सोशल मीडियावरुन प्रतिक्रिया देत अजित पवारांचं समर्थन केलं आहे आणि आपल्या पक्षातीलच काही नेत्यांवरही अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.

रोहित पवार म्हणाले – “जाणूनबुजून मीडिया ट्रायल”

रोहित पवारांनी त्यांच्या अधिकृत एक्स (पूर्वीचं ट्विटर) अकाउंटवर पोस्ट करत अजित पवार यांच्यावर होणाऱ्या टीकेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी म्हटलं की:

“कुर्डुवाडी प्रकरणात आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची भूमिका योग्य होती, मात्र अजित पवार यांच्या हिंदी भाषा आणि बोलण्याच्या शैलीमुळे गैरसमज निर्माण झाला. त्यांनी त्याबद्दल आधीच दिलगिरी व्यक्त केली आहे. तरीदेखील काही सिलेक्टिव्ह सामाजिक कार्यकर्त्यांना पुढे करून मीडिया ट्रायल केली जात आहे, हे खपवून घेण्यासारखं नाही.”

पक्षातील अंतर्गत कुरघोड्यांवर रोहित पवारांचा इशारा

या प्रकरणात रोहित पवारांनी पक्षातीलच काही नेत्यांवरही निशाणा साधला आहे. त्यांनी म्हटलं की:

“राजकीय स्कोअर सेट करण्यासाठी आपल्या नेत्याची विनाकारण मीडिया ट्रायल सुरू असताना, पक्षातील काही दोन-तीन नंबरच्या ज्येष्ठ नेत्यांनी मित्रपक्षाची प्रो भूमिका घेत अंतर्गत कुरघोड्या करणं कितपत योग्य आहे?”

या वक्तव्यातून रोहित पवारांनी थेट नाव न घेता पक्षातील काही मंडळींना लक्ष्य केल्याचं स्पष्ट होत आहे.

“चहापेक्षा किटली गरम असणारे सहकारी”

पोस्टच्या शेवटी रोहित पवारांनी उपरोधिक भाषेत टीका करत म्हटलं की:

“पक्षात ‘चहापेक्षा किटली गरम असणारे’ एक-दोन सहकारी असले की, आमदार सोबत असूनही सर्वकाही आलबेल असतेच असे नाही. याचा अनुभव पक्ष नेतृत्वाला यानिमित्ताने आलाच असेल.”

यासोबत त्यांनी #अजितपवार हा हॅशटॅग वापरला आहे.

मीडिया ट्रायलपेक्षा खऱ्या मुद्द्यांवर लक्ष द्या – रोहित पवार

रोहित पवारांनी माध्यमांनाही अप्रत्यक्षपणे सुनावत म्हटलं की:

“मित्रपक्षांच्या नेत्यांची मीडिया ट्रायल करण्याऐवजी, शेतकऱ्यांचे प्रश्न, युवकांचे रोजगाराचे प्रश्न, महिला सुरक्षेचे मुद्दे आणि भ्रष्टाचाराच्या प्रकरणांवर लक्ष केंद्रीत केलं पाहिजे. अशा प्रकरणांवर कार्यवाही झाली पाहिजे.”

काय आहे कुर्डुवाडी प्रकरण?

कुर्डुवाडीमध्ये सुरू असलेल्या अवैध मुरूम उत्खननावर कारवाई करणाऱ्या महिला आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फोन करून कारवाई थांबवण्यास सांगितल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला. या प्रकरणामुळे संपूर्ण राज्यात संतप्त प्रतिक्रिया उमटल्या असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही अजित पवारांवर नाराजी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button