Latest NewsMaharashtra

लालबागचा राजावर ‘कॉर्पोरेट ब्रँडिंग’चा आरोप; मनसेचा जोरदार हल्लाबोल — “पुढचं काय? गणपतीत गरबा?”

मुंबई : महाराष्ट्राच्या गणेशोत्सव संस्कृतीत ‘लालबागचा राजा’ हे एक सर्वोच्च नाव. मात्र यंदाचा उत्सव विविध वादांमुळे गाजत असतानाच आता मनसेने (महाराष्ट्र नवनिर्माण सेना) या मंडळावर थेट टीकास्त्र सोडलं आहे. ‘जिओ’ने लालबागच्या राजा मंडळाचं ब्रँडिंग केल्यावरून मनसे नेते संदीप देशपांडे यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली असून, “ही गोष्ट फारच भीतीदायक व मराठी संस्कृतीसाठी धोकादायक आहे,” असं म्हणत सरकार आणि मंडळ प्रशासनावर जोरदार हल्ला चढवला आहे.

“लालबागचा राजाला आता गरबा बघायला मिळेल!”

देशपांडे म्हणाले,

“ज्या पद्धतीने उद्योग समूह गणेशोत्सव मंडळांवर ब्रँडिंगच्या माध्यमातून अधिपत्य मिळवत आहेत, ते मराठी मंडळांसाठी धोक्याची घंटा आहे. उद्या जर अदानींना वाटलं तर ते बाजूचं गणपती मंडळ घेतील आणि तिथे फक्त अदानींचं ब्रँडिंग असेल. पुढच्या वेळेला गणपतीत गरबा खेळतील अशी वेळ यायला नको.”

त्यांनी हेही स्पष्ट केलं की, लालबागचा राजा हे केवळ धर्माचं नव्हे तर सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे. त्यामुळे या उत्सवात कॉर्पोरेट कल्चरचा अतिक्रमण होणं हे मूळ उद्दिष्टांवरच घाला घालणं आहे.

“गणेशोत्सव म्हणजे ब्रँडिंगचं मैदान?”

देशपांडे म्हणाले,

“लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करताना सामाजिक एकोपा, सुधारणांची भावना निर्माण व्हावी, म्हणून हा उत्सव साजरा केला होता. मात्र आज गणपती मंडळ कॉर्पोरेट ब्रँडिंगसाठी व्यासपीठ बनत आहेत.”

“जिओने ब्रँडिंग केलं हे क्लेषदायक आणि मनाला दु:ख देणारं आहे. उद्या जर अदानी, टाटासारख्या उद्योग समूहांनी गणपतीवर ‘हक्क’ सांगितला तर लोकांचा उत्सव हा श्रीमंतांचा शो बनून जाईल,” अशी तीव्र टीका त्यांनी केली.

‘कॉर्पोरेट टेकओव्हर’चं सावट

लालबागचा राजा मंडळावर यावर्षी झालेली टीका काही ठराविक मुद्द्यांवर केंद्रित आहे:

जिओ ब्रँडिंग वाद – मंडळावर प्रमुख प्रायोजक म्हणून जिओचे भव्य प्रमोशनल बॅनर आणि डिजिटल डिस्प्ले लावण्यात आले, ज्यामुळे ‘कॉर्पोरेट टेकओव्हर’चा आरोप.

अंबानी ट्रस्टी वाद – अंबानी कुटुंबातील व्यक्तीला मंडळाचा ट्रस्टी बनवण्यात आल्याने ‘मंडळ विकले गेले’ असा आरोप.

गुजराती कंपनीला विसर्जन कॉन्ट्रॅक्ट – स्थानिक कोळी समाजाऐवजी गुजरातच्या कंपनीला विसर्जनाची जबाबदारी दिली गेल्यामुळे स्थानिक नाराजी.

VIP दर्शन व भेदभाव – सामान्य भक्तांना ४८ तास प्रतीक्षा, तर VIP मंडळींना १५-३० मिनिटांत प्रवेश, यावरून मानवी हक्क आयोगाकडून नोटिसा.

“राजा विकला गेला का?”

या वर्षी लालबागचा राजा गणपतीमागे खालील प्रमुख वाद उभे राहिले:

विसर्जनातील उशीर व गोंधळ: आधुनिक तराफ्यावर मूर्ती ठेवता न आल्याने समुद्रकिनाऱ्यावर १२ तास विसर्जन थांबले.

भाविकांचा छळ: मच्छीमार संघटनांनी दर्शन प्रक्रियेतील अडचणींवर आक्षेप घेतला.

कॉर्पोरेट प्रभाव: मंडळावर उद्योग समूहांचा अतिरेक वाढल्याची टीका.

“पैशांपेक्षा श्रद्धा मोठी आहे”

देशपांडे यांनी स्पष्ट केलं की,

“लालबागचा राजाला पैशांची कधीच कमी नव्हती आणि यापुढेही राहणार नाही. हा उत्सव लोकांचा आहे. त्यामुळे पैशाच्या किंवा ब्रँडिंगच्या आधारे राजाचं अधिपत्य बदलू नये.”

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button