पनवेलमध्ये थरार! जामिनावर असलेल्या आरोपीकडून पोलिसांवर कुऱ्हाडीचा हल्ला; दोन पोलीस जखमी, मुलगी ओलीस

पनवेल (Panvel) शहरात बुधवारी रात्री एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून प्रकरणात जामीनावर सुटलेल्या सोबन बाबुलाल महातो या आरोपीने पोलिसांवर कुऱ्हाडीने हल्ला चढवला. या हल्ल्यात दोन पोलीस गंभीर जखमी झाले असून काही पोलिसांना किरकोळ दुखापत झाली आहे.
घटनेदरम्यान आरोपीने स्वतःच्या भावाची 16 वर्षीय मुलगी ओलीस धरली आणि तिच्या गळ्यावर कोयता ठेवून धमक्या दिल्या. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून भीतीचं वातावरण पसरलं.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सोबन महातो याने मंगला निवास इमारत स्वतःच्या मालकीची असल्याचा दावा केला. याच वादातून त्याने एका खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि पोलिसांनाही आत येऊ न देण्याचा पवित्रा घेतला. पोलिसांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता त्याने कुऱ्हाड आणि कोयत्याने अचानक हल्ला चढवला.
जखमी पोलिसांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तर आरोपीने मुलगी ओलीस ठेवल्याने पोलिसांना मोठ्या शर्थीने कारवाई करावी लागली. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू असून, पनवेल पोलिसांनी परिसरात कडेकोट सुरक्षा तैनात केली आहे.



