अंबाळा तलावात बुडून १८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू

नागपूर: नागपूर जिल्ह्यातील रामटेक शहरालगत असलेल्या सुप्रसिद्ध अंबाळा तलावात आज (बुधवार) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पाण्यात बुडून एका १८ वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. सुजल लिखित पटले (वय १८, रा. कटोरी, मानेगाव, ता. खैरलांजी, जि. बालाघाट) असे मृत मुलाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजल आपल्या वडिलांच्या मावशीच्या अस्थि विसर्जनासाठी कुटुंबीयांसह रामटेक अंबाळा येथे आला होता. विधी आटोपल्यानंतर काही जण आंघोळीसाठी तलावाच्या पाण्यात उतरले, ज्यात सुजलचाही समावेश होता. तलावाच्या पायऱ्या उतरत असताना सुजलचा पाय अचानक खोल पाण्यात गेला. पाण्याचा अंदाज नसल्याने तो बुडू लागला.
त्यावेळी उपस्थित लोकांनी आरडाओरड केली, मात्र वेळेवर कोणतीही मदत न मिळाल्याने सुजलचा दुर्दैवी अंत झाला. घटनेची माहिती रामटेक पोलिसांना देण्यात आली. रामटेक पोलिसांनी तात्काळ एसडीआरएफ (SDRF) टीमला माहिती दिली, परंतु ते येईपर्यंत स्थानिक नागरिकांनी सुजलचा मृतदेह पाण्याबाहेर काढला होता.
रामटेक पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह शवविच्छेदनासाठी रामटेक रुग्णालयात पाठवला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांवर शोककळा पसरली असून, रामटेक पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.



