राज्यातील शाळा २ दिवस बंद : शिक्षकांचा आझाद मैदानावर आंदोलनाचा इशारा, शासनाच्या अनुदान निर्णयाला विरोध

मुंबई : राज्यातील अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांमधील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी दिनांक ०८ व ०९ जुलै २०२५ रोजी शाळा बंद आंदोलन पुकारले असून, यामुळे राज्यातील शाळा दोन दिवसांसाठी बंद राहणार आहेत. हे आंदोलन आझाद मैदान, मुंबई येथे भव्य स्वरूपात पार पडणार आहे.
अनुदानाच्या प्रतीक्षेत शिक्षक; निर्णयाची विलंबामुळे नाराजी
राज्य शासनाने दिनांक १४ ऑक्टोबर २०२४ रोजी घेतलेल्या निर्णयानुसार, अनुदानित व अंशतः अनुदानित शाळांसाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. तसेच, मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या १० ऑक्टोबर २०२४ च्या मंत्रीमंडळ बैठकीत अनुदानाचा पुढील वाढीव टप्पा मंजूर करण्याचे आश्वासनही देण्यात आले होते.
तथापि, या आश्वासनाला अजूनही प्रत्यक्ष अंमलबजावणी मिळालेली नसल्याने शिक्षक वर्गात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. मागील ७५ दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनानंतरही सरकारकडून ठोस निर्णय न घेतल्यामुळे आता शिक्षकांनी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याचा निर्णय घेतला आहे.
संघटनांचा बिनशर्त पाठिंबा
या शाळा बंद आंदोलनाला महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक महामंडळ, महाराष्ट्र राज्य संयुक्त मुख्याध्यापक महामंडळ आणि राज्यातील सर्व प्रमुख शिक्षक संघटनांनी बिनशर्त पाठिंबा जाहीर केला आहे.
विद्यार्थ्यांचे नुकसान होणार, परंतु शिक्षक निर्धारात ठाम
दोन दिवसांच्या या आंदोलनामुळे लाखो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याची शक्यता असली तरी, न्यायासाठीचा लढा अधिक महत्त्वाचा असल्याचा ठाम निर्धार आंदोलनकर्त्या शिक्षकांनी व्यक्त केला आहे. शासनाने त्वरीत सकारात्मक निर्णय घ्यावा अन्यथा पुढील आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा देखील संघटनांनी दिला आहे.



