सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आयोगाचे लक्ष; NAMASTE योजनेच्या अंमलबजावणीचा अमरावतीत आढावा!

महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात बैठक; आरोग्य, सुरक्षा, सामाजिक संरक्षण आणि प्रलंबित सेवाविषयक प्रश्नांवर चर्चा
अमरावती : शहराच्या स्वच्छतेची जबाबदारी सांभाळणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर आता महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाने लक्ष केंद्रित केले आहे. सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षित कामाचे वातावरण, आरोग्य सुविधा, सामाजिक सुरक्षा आणि शासनाच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळतो की नाही, याची पडताळणी करण्यासाठी अमरावती महानगरपालिकेत महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे अध्यक्ष शेरसिंग रुक्कानसिंग डागोर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, २७ नोव्हेंबर रोजी मनपाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये ही बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीत अमरावती शहरातील सफाई कर्मचाऱ्यांच्या सामाजिक, आर्थिक, आरोग्यविषयक तसेच सेवेशी संबंधित विविध समस्यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. विशेषतः केंद्र शासनाच्या ‘नमस्ते’ (NAMASTE) योजनेची शहरातील अंमलबजावणी हा बैठकीतील महत्त्वाचा विषय ठरला. या योजनेंतर्गत सफाई कर्मचाऱ्यांचे सर्वेक्षण, प्रोफाइलिंग, आरोग्य तपासणी, सामाजिक सुरक्षा, कौशल्यविकास प्रशिक्षण आणि कामाच्या ठिकाणी आवश्यक सुरक्षा साधने उपलब्ध करून देण्याबाबत चर्चा करण्यात आली.
नमस्ते योजनेच्या निधीच्या विनियोगावर चर्चा
केंद्र शासनाच्या National Action for Mechanized Sanitation Ecosystem (NAMASTE) या योजनेंतर्गत अमरावती महानगरपालिकेला प्राप्त झालेला निधी, त्याचा प्रत्यक्ष विनियोग आणि पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचविण्यासाठी करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आयोगाच्या अध्यक्षांनी आढावा घेतला. सफाई कर्मचाऱ्यांचे काम अधिक सुरक्षित व्हावे, त्यांना आवश्यक प्रशिक्षण मिळावे आणि आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध व्हाव्यात, यासाठी संबंधित विभागांनी प्रभावीपणे कार्यवाही करण्याबाबत चर्चा करण्यात आली.
न्यायालयीन निर्देश आणि लाड-पागे समितीच्या शिफारशींचाही आढावा
बैठकीत मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठातील याचिका क्रमांक ३९५०/२०२ आणि दिवाणी अर्ज क्रमांक १५४३४/२०२३ मधील निर्देशांच्या अनुषंगाने महानगरपालिकेने केलेल्या कार्यवाहीचाही आढावा घेण्यात आला. यासोबतच लाड-पागे समितीच्या शिफारशींनुसार प्रलंबित असलेली प्रकरणे, त्यावर झालेली कार्यवाही आणि सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवाविषयक इतर प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.
सफाई कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी भेडसावणाऱ्या अडचणी जाणून घेत त्यांच्या निराकरणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याबाबत संबंधित विभागांना मार्गदर्शन करण्यात आले. कर्मचाऱ्यांना सन्मानजनक कामाचे वातावरण, पुरेशी सुरक्षा साधने, आरोग्य सुविधा आणि सामाजिक संरक्षण मिळणे आवश्यक असल्याचे या बैठकीत अधोरेखित करण्यात आले.
या बैठकीला अमरावती महानगरपालिका आयुक्त डॉ. मंगेश गोंदावले, अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, शिल्पा नाईक, उपायुक्त नरेंद्र वानखडे, भाग्यश्री बोरेकर, मुख्य लेखाधिकारी शिल्पा पवार, शहर अभियंता श्रीधर कांबळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



