महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती मनपात अभिवादन; महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण

चित्रा चौकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यालाही केले अभिवादन; उपमहापौर सचिन भेंडे यांच्यासह पदाधिकारी, नगरसेवक व अधिकारी उपस्थित
अमरावती : स्त्री शिक्षण, सामाजिक समता आणि वंचितांच्या हक्कांसाठी आयुष्यभर संघर्ष करणारे क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त अमरावती महानगरपालिकेत अभिवादन व हारार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शनिवारी, २८ नोव्हेंबर २०२६ रोजी महानगरपालिकेच्या विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

यानंतर चित्रा चौक येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींनीही महात्मा फुले यांच्या महान कार्याचे स्मरण करत त्यांना आदरांजली वाहिली.

महात्मा ज्योतिबा फुले यांनी समाजातील विषमता, अंधश्रद्धा आणि जातिभेदाविरोधात लढा देत शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. विशेषतः महिला शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवून त्यांनी सामाजिक परिवर्तनाची दिशा निर्माण केली. त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प यानिमित्ताने व्यक्त करण्यात आला.
या कार्यक्रमाला उपमहापौर सचिन भेंडे, स्थायी समिती सभापती अविनाश मार्डीकर, सभागृह नेते चेतन गावंडे, गटनेते नाना आमले, डॉ. राजेंद्र तायडे, शिक्षण समिती उपसभापती वंदना मडघे, नगरसेवक संजय तिरथकर, नगरसेविका सुनीता भेले, राजश्री जटाळे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त महेश देशमुख, उपायुक्त योगेश पिठे, सहाय्यक आयुक्त भूषण पुसतकर, नितीन गोडबोले, भूषण खडेकार, अखिलेश खडेकार, सतीश ताथोड, आकाश मानकर तसेच महानगरपालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



