citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा; ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त

सदरमधील ‘हॉटेल डाउन टाउन कॅफे’वर कारवाई; तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, हुक्का पॉटसह विविध साहित्य हस्तगत

नागपूर : शहरात अवैध हुक्का व्यवसायाविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सदर परिसरातील माउंट रोडवर असलेल्या ‘हॉटेल डाउन टाउन कॅफे’ येथे पोलिसांनी छापा टाकून हुक्का पॉटसह विविध साहित्य असा एकूण ३२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, २६ नोव्हेंबर २०२६ रोजी सदर पोलीस ठाण्यातील तपास पथकाला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी माउंट रोडवरील हॉटेल डाउन टाउन कॅफे येथे तपासणी केली. यावेळी हुक्का व्यवसायासाठी वापरले जाणारे विविध साहित्य आढळून आले.

या कारवाईत पोलिसांनी सहा हुक्का पॉट, हुक्क्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नळ्या, एक्स्ट्रीम कंपनीचे हुक्का फ्लेवर, लोखंडी चिमटा, चिनी मातीचे चिलम, हुक्का पाईप, कोळसा, फिल्टर प्लास्टिक नळ्या, शिगडी जाळण्यासाठी लागणारे साहित्य तसेच सॅमसंग कंपनीचा रेफ्रिजरेटर असा एकूण ३२ हजार ९६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी शशांक अशोकलिंग बैस (वय ३७), निखिल सुनील लुंगिफर (वय २५) आणि निखिल खुशाल कुनेरिया (वय ३३) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. संबंधित तिघांना सूचनापत्रावर सोडण्यात आल्याची नोंद पोलीस प्रेस नोटमध्ये आहे. सिगारेट व इतर तंबाखूजन्य उत्पादने जाहिरात प्रतिबंध आणि व्यापार, उत्पादन, पुरवठा व वितरण अधिनियम २००३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलीस आयुक्त विनिता साहू, पोलीस उपायुक्त नित्यानंद झा आणि सदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त शिवप्रसाद पारवे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या नेतृत्वात ही कारवाई करण्यात आली. पोलीस उपनिरीक्षक निकेतन किल्लेदार यांच्यासह सदर पोलीस ठाण्यातील पथकाने या कारवाईत सहभाग घेतला.

शहरातील अवैध हुक्का व्यवसाय आणि तंबाखूजन्य पदार्थांच्या नियमबाह्य वापरावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले असून, अशा प्रकारांविरोधात पुढील काळातही कारवाई सुरू राहणार असल्याचे या कारवाईतून स्पष्ट झाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button