citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपूर पोलिसांची मोठी कारवाई! विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चार चोरीचे गुन्हे उघड; १ लाख ८ हजारांचा मुद्देमाल जप्त

पाचपावलीतील तीन आणि एमआयडीसीतील एक चोरीचा गुन्हा उघडकीस; दुचाकी चोरीसह मेडिकल स्टोअर फोडून रोकड लंपास केल्याची कबुली

नागपूर : नागपूर शहरात चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांनी सुरू केलेल्या कारवाईत पाचपावली पोलिसांना महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेत पोलिसांनी वाहनचोरीसह दुकानफोडीचे एकूण चार गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एकूण १ लाख ८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार आपली स्प्लेंडर दुचाकी क्रमांक MH 49 ER 1683 उभी करून महाप्रसाद घेण्यासाठी गेले असताना अज्ञात चोरट्याने त्यांची दुचाकी चोरून नेली होती. याप्रकरणी पाचपावली पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ७३७/२०२६, भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला होता.

गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी कमाल चौक तसेच आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्याचबरोबर गुप्त बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एका विधीसंघर्षग्रस्त बालकाला ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने संबंधित गुन्ह्याची कबुली दिली.

चौकशीदरम्यान या बालकाने पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकर गार्डन येथून एक स्प्लेंडर मोटारसायकल चोरी केल्याचे सांगितले. तसेच इंदोरा चौक परिसरातील एका मेडिकल स्टोअरचे शटर तोडून रोकड रक्कम चोरल्याची कबुली दिली. याशिवाय एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सीम टाकळी परिसरातून एक डिओ मोपेड चोरी केल्याचेही तपासात समोर आले.

अशा प्रकारे पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन आणि एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक असे एकूण चार चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. या कारवाईत पोलिसांनी एकूण १ लाख ८ हजार ३२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ही कारवाई पोलीस आयुक्त विश्वास नागरे पाटील, सहपोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, सहपोलीस आयुक्त विनिता शाह, उत्तर विभागाचे अपर पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त राहुल मदने आणि संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिमंडळ क्रमांक ३ तसेच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांच्या सहकार्याने करण्यात आली.

या कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र बोबडे, पोलीस निरीक्षक विवेक पडघान यांच्यासह पाचपावली पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. एका विधीसंघर्षग्रस्त बालकाकडून चार गुन्ह्यांचा उलगडा झाल्याने नागपूर पोलिसांच्या तपासाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button