citynewsMaharashtraNagpurpolitics

महिला आरक्षणासाठी डी-लिमिटेशन आवश्यकच; सर्वांनी विधेयकाला पाठिंबा द्यावा – प्रफुल्ल पटेल

शरद पवार यांना एनडीएमध्ये येण्याची विनंती केली आहे; ते सहभागी झाल्यास आनंदच होईल – प्रफुल्ल पटेल यांचे सूचक विधान; इंडिया आघाडी आणि डी-लिमिटेशनच्या मुद्द्यावर नागपुरात मांडली भूमिका

नागपूर : महिला आरक्षणाची अंमलबजावणी करायची असेल, तर लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना अर्थात डी-लिमिटेशन करणे आवश्यक आहे. महिला आरक्षण आणि डी-लिमिटेशन हे एकमेकांशी संबंधित महत्त्वाचे विषय असून, यासाठी सरकारने आणलेल्या विधेयकाला सर्वांनी एकत्र येऊन पाठिंबा द्यावा, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल्ल पटेल यांनी व्यक्त केले. नागपुरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना त्यांनी महिला आरक्षण विधेयक, मतदारसंघ पुनर्रचना, दक्षिण भारतातील राज्यांची चिंता आणि इंडिया आघाडीच्या राजकारणावर सविस्तर भूमिका मांडली.

महिला आरक्षणाच्या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसने सुरुवातीपासूनच पाठिंबा दिला असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले. पहिल्यांदा हे विधेयक संसदेत आले, त्यावेळीही पक्षाने त्याच्या बाजूने भूमिका घेतली होती. महिलांना ३३ टक्के आरक्षण देणे ही काळाची गरज आहे. मात्र, त्याचवेळी लोकसंख्येतील वाढ आणि बदलती भौगोलिक परिस्थिती लक्षात घेऊन मतदारसंघांच्या सीमांची पुनर्रचना होणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे ते म्हणाले.

यापूर्वी दर १५ वर्षांनी डी-लिमिटेशनच्या माध्यमातून मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. अनुसूचित जाती आणि जमातींसाठी राखीव असलेल्या मतदारसंघांमध्येही लोकसंख्येच्या प्रमाणानुसार फेरबदल झाले आहेत. शहरांची लोकसंख्या वाढत असताना मतदारसंघांची रचना मात्र त्याच पद्धतीने कायम ठेवणे योग्य नाही. नागपूरमध्ये पूर्वी पाच विधानसभा मतदारसंघ होते, आता त्यांची संख्या सहा झाली आहे. त्यामुळे वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात खासदार आणि आमदारांच्या मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

दक्षिण भारतावर अन्याय होणार नाही, याची काळजी

डी-लिमिटेशनच्या मुद्द्यावर दक्षिण भारतातील राज्यांनी व्यक्त केलेली चिंता महत्त्वाची असल्याचे पटेल यांनी नमूद केले. दक्षिण भारतातील राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणासाठी चांगले काम केले आहे, तर उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये लोकसंख्येत मोठी वाढ झाली आहे. अशा परिस्थितीत केवळ लोकसंख्येच्या आधारावर मतदारसंघांची पुनर्रचना केल्यास दक्षिण भारतातील राज्यांचे लोकसभेतील प्रतिनिधित्व कमी होण्याची आणि उत्तर भारतातील राज्यांच्या जागा वाढण्याची शक्यता होती. ही संभाव्य विसंगती टाळण्यासाठी सध्याच्या लोकसभेतील जागा कायम ठेवून त्यामध्ये ५० टक्के वाढ करण्याचा प्रस्ताव असल्याचे त्यांनी सांगितले.

उदाहरण देताना त्यांनी महाराष्ट्रातील लोकसभेच्या ४८ जागा वाढून ७२ होतील, उत्तर प्रदेशातील ८० जागा वाढून १२० होतील, तर तामिळनाडू आणि पुद्दुचेरी मिळून असलेल्या ४० जागा वाढून ६० होतील, असे स्पष्ट केले. त्यामुळे कोणत्याही राज्यावर अन्याय होणार नाही, अशा पद्धतीने या विषयाचा विचार करण्यात आल्याचे पटेल म्हणाले.

विदर्भातील मोठ्या मतदारसंघांची पुनर्रचना गरजेची

विदर्भातील भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण लोकसभा मतदारसंघांचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. भंडारा-गोंदिया आणि गडचिरोली लोकसभा मतदारसंघांचे क्षेत्र मोठे आहे. गडचिरोली मतदारसंघाचा विस्तार गोंदियापासून आंध्र प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडच्या सीमांपर्यंत असून, या मतदारसंघात जवळपास ५०० किलोमीटरचे अंतर आहे. भंडारा-गोंदिया मतदारसंघाचीही भौगोलिक व्याप्ती मोठी आहे. त्यामुळे अशा मतदारसंघांची पुनर्रचना करून सीमांमध्ये आवश्यक बदल करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपूर शहरातही विदर्भातील विविध जिल्ह्यांमधून मोठ्या प्रमाणात नागरिक येऊन स्थायिक झाले आहेत. त्यामुळे शहराची लोकसंख्या वाढली असून, या बदलत्या परिस्थितीचा विचार मतदारसंघांच्या पुनर्रचनेत केला पाहिजे, असे पटेल म्हणाले.

डी-लिमिटेशनच्या मुद्द्यावर राजकारण केले जात असल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. आपण केंद्रीय मंत्री असताना यापूर्वीही मतदारसंघांच्या सीमांमध्ये बदल करण्यात आले होते. नागपूर आणि गडचिरोलीतील मतदारसंघांच्या सीमांमध्येही त्यावेळी फेरबदल झाले होते. तेव्हा त्यात राजकारण नव्हते, मग आता या विषयावर राजकारण का केले जात आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. डी-लिमिटेशन झाले नाही, तर महिला आरक्षणाची अंमलबजावणी कशी करणार? त्यामुळे महिला आरक्षण लागू करायचे असेल, तर सरकारने आणलेल्या विधेयकाला सर्वांनी एकत्रितपणे मंजुरी द्यावी, असे आवाहनही त्यांनी केले.

डी-लिमिटेशनला पाठिंबा म्हणजे इंडिया आघाडीतून बाहेर पडणे नव्हे

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का, या प्रश्नावर पटेल यांनी दोन्ही मुद्दे वेगळे असल्याचे स्पष्ट केले. डी-लिमिटेशन विधेयकाला पाठिंबा देणे आणि इंडिया आघाडीत सहभागी असणे या दोन स्वतंत्र बाबी आहेत. या विधेयकाला पाठिंबा देण्यामागे स्वतंत्र भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले.

शरद पवार यांच्याकडून एखादा प्रस्ताव किंवा पत्र आल्यास एनडीएमध्ये सहभागी होण्याच्या प्रश्नाचे उत्तर देता येईल, असे सूचक विधानही त्यांनी केले. यापूर्वी इंडिया आघाडीत असताना अजित पवार यांनी पक्षाच्या वतीने स्वतंत्र पत्र दिले होते आणि त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस एनडीएमध्ये सहभागी झाली होती. त्यामुळे भविष्यात शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना याबाबत काही निर्णय घ्यायचा असल्यास त्यासाठी स्वतंत्र पत्र द्यावे लागेल. पुढील निर्णय घेण्याचा अधिकार त्यांच्या पक्षाचा असल्याचे पटेल यांनी स्पष्ट केले.

शरद पवार माझे कालही नेते होते, आजही आहेत!

शरद पवार यांच्याबद्दल बोलताना प्रफुल्ल पटेल यांनी आपली निष्ठा आणि आदर कायम असल्याचे सांगितले. शरद पवार हे कालही माझे नेते होते आणि आजही माझे नेते आहेत. त्यांच्याबद्दल माझ्या मनात नेहमीच आदर आणि निष्ठा राहिली आहे आणि यापुढेही ती कायम राहील, असे ते म्हणाले. पवार साहेबांची तब्येत खराब असल्याचे समजल्यास त्यांना भेटायला जाणारा मी पहिला व्यक्ती असेन, असेही त्यांनी नमूद केले.

शरद पवार यांच्याशी आपले नियमित बोलणे होत असल्याचे सांगत, आपण त्यांना एनडीएमध्ये सहभागी होण्याची विनंती केल्याचा खुलासाही पटेल यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशात चांगले काम करत आहेत, तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रात विकासाची कामे करीत आहेत. त्यामुळे शरद पवार यांनीही एनडीएमध्ये सहभागी व्हावे, असे आपण त्यांना अनेकदा सांगितले आहे. ते एनडीएमध्ये आले, तर आपल्याला अधिक आनंद होईल, असेही पटेल म्हणाले.

काँग्रेसच्या टीकेला प्रत्युत्तर; योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात

शरद पवार यांच्यावर काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेबाबत बोलताना पटेल यांनी १९९९ मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थापनेचा संदर्भ दिला. त्यावेळी सोनिया गांधी यांच्या मुद्द्यावरून काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना करण्यात आली होती. त्या काळातही अनेकांनी आपल्याला संधीसाधू म्हटले होते. मात्र, राजकारणात योग्य वेळी योग्य निर्णय घ्यावे लागतात. काहींना ते निर्णय योग्य वाटतात, तर काहीजण त्यावर टीका करतात. त्यामुळे टीका करणाऱ्यांना टीका करू द्यावी, असे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाची धुरा चांगल्या पद्धतीने सांभाळली जात असून, देशात विकासाची कामे होत आहेत. चांगले काम झाले तरी काही लोक टीका करतात; मात्र नरेंद्र मोदी यांनी देशाच्या विकासासाठी दिलेले योगदान जनतेला मान्य असल्याचे पटेल यांनी सांगितले.

इंडिया ब्लॉकच्या बैठकीला नीलेश लंके उपस्थित राहणार

दरम्यान, इंडिया ब्लॉकच्या आगामी बैठकीबाबत विचारले असता, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे खासदार नीलेश लंके या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती आपल्याला फोनवर मिळाली असल्याचे पटेल यांनी सांगितले. ते बैठकीला उपस्थित राहिल्यानंतर या विषयावर अधिक बोलता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button