मॉर्निंग वॉकला गेलेल्या कैलास खंडारे यांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू; उपचारादरम्यान अमरावतीत प्राणज्योत मालवली

अशोक नगरातील ४२ वर्षीय युवकाचा अपघात; पत्नी, दोन मुली आणि मुलगा असा परिवार पोरका
धामणगाव रेल्वे : सकाळी मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या ४२ वर्षीय युवकाला अज्ञात चारचाकी वाहनाने जोरदार धडक दिल्याची दुर्दैवी घटना घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या कैलास खंडारे यांचा अमरावती येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेमुळे अशोक नगर परिसरासह संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे.
प्राप्त माहितीनुसार, अशोक नगर येथील रहिवासी कैलास खंडारे हे रविवारी सकाळी सुमारे ६ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडले होते. यावेळी एका अज्ञात चारचाकी वाहनाने त्यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ते गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर घटनास्थळी उपस्थित ग्रामस्थ आणि नागरिकांनी तत्परता दाखवत त्यांना तातडीने धामणगाव रेल्वे येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांची प्रकृती गंभीर असल्याने पुढील उपचारासाठी अमरावती येथे हलविण्यात आले. तेथे उपचार सुरू असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली.
हसत्याखेळत्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
कैलास खंडारे यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि एक मुलगा असा परिवार आहे. कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या अकाली निधनाने अशोक नगर आणि परिसरातील नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध घेतला जात आहे.
सिटी न्यूज प्रतिनिधी संतोष वाघमारे, धामणगाव रेल्वे



