AmravaticitynewsLatest NewsMaharashtra

मनपाचे सील एका दरवाजाला, मात्र मागील दरवाजातून राजमहल हॉटेल सुरू?

१३ लाख ९५ हजारांची करथकबाकी; जप्तीनंतरही मंगल कार्यालयात कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचा आरोप, आयुक्त कारवाई करणार का?

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती महानगरपालिकेने करथकबाकीपोटी जप्त केलेले दस्तूरनगर एमआयडीसी मार्गावरील राजमहल हॉटेल आणि मंगल कार्यालय पुन्हा सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. १९ नोव्हेंबर २०२६ रोजी महानगरपालिकेच्या पथकाने या मालमत्तेवर जप्तीची कारवाई केली होती. मात्र, आता हॉटेलचा मागील दरवाजा उघडून आत कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचे निदर्शनास आल्याने महापालिकेच्या कारवाईच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

१३ लाख ९५ हजारांच्या थकबाकीमुळे जप्तीची कारवाई

मिळालेल्या माहितीनुसार, राजमहल हॉटेलच्या मालकाकडे महानगरपालिकेचा १३ लाख ९५ हजार ४९० रुपयांचा कर थकीत असल्याने मालमत्ता जप्त करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार १९ नोव्हेंबर रोजी महानगरपालिकेच्या वतीने सहाय्यक अभियंता बोबडे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने कारवाई केली.

या कारवाईदरम्यान हॉटेलच्या एका दरवाजावर जप्तीची नोटीस चिकटविण्यात आली होती. तसेच हॉटेल बंद ठेवण्याचे आदेशही नोटिशीत देण्यात आल्याची माहिती आहे.

मागील दरवाजा उघडून कार्यक्रमाची तयारी?

मात्र, पाहणीदरम्यान हॉटेलचा दुसरा म्हणजे मागील दरवाजा उघडा असल्याचे आणि आत कार्यक्रमाच्या तयारीची लगबग सुरू असल्याचे निदर्शनास आल्याचा दावा करण्यात येत आहे. महापालिकेने जप्तीची कारवाई करूनही मालमत्तेचा वापर सुरू असल्यास हा आदेशाचा अवमान ठरू शकतो, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

या प्रकारामागे कोणाची पाठराखण?

महानगरपालिकेने जप्त केलेल्या मालमत्तेतून मागील दरवाजाने प्रवेश करून कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचा प्रकार गंभीर मानला जात आहे. महापालिकेच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसेल, तर यामागे कोणाची पाठराखण आहे का, असा सवालही उपस्थित होत आहे.

आयुक्त चौकशी करून कारवाई करणार का?

या संपूर्ण प्रकरणाची महानगरपालिका आयुक्तांनी तातडीने चौकशी करावी आणि जप्तीच्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे आढळल्यास संबंधितांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.

महानगरपालिकेने केलेल्या जप्तीच्या कारवाईनंतरही राजमहल हॉटेलमध्ये कार्यक्रमाची तयारी सुरू असल्याचा आरोप खरा ठरतो का, याची प्रशासनाकडून पडताळणी होणे आवश्यक आहे. आता महापालिका आयुक्त या प्रकरणाची दखल घेऊन काय कारवाई करतात, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button