citynewslatestnewss breakingnewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

कळमना पोलिसांची वाहनचोरावर कारवाई; दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघड!

२२ वर्षीय आरोपीला अटक; दोन चोरीच्या दुचाकींसह ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त, सीसीटीव्ही आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाला यश

नागपूर : शहरातील वाहनचोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी कळमना पोलिसांनी विशेष तपास मोहीम राबवत दोन दुचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. या कारवाईत एका २२ वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून चोरीच्या दोन दुचाकी असा एकूण ४५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीचा माग काढत ही कारवाई केली.

दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून दुचाकींची चोरी

पहिल्या घटनेत फिर्यादी शालिकराम गजपाल (वय ४८, रा. संजयनगर, बच्चा पार्टी हनुमान मंदिर परिसर, टीपी सिग्नल, नागपूर) यांनी आपली लाल रंगाची हिरो होंडा दुचाकी (क्रमांक एमएच ४९ सीएल २०७०) आरटीओ कार्यालयासमोर उभी केली होती. मात्र, अज्ञात चोरट्याने संधी साधून सुमारे ३० हजार रुपये किमतीची दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी कळमना पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८८१/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दुसऱ्या घटनेत फिर्यादी सूर्या बाबुराव जांभुळकर (वय २४) यांनी १६ नोव्हेंबर २०२६ रोजी आपली काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी (क्रमांक एमएच ४९ एल ६८१९) घरासमोर उभी केली होती. अज्ञात चोरट्याने सुमारे १५ हजार रुपये किमतीची ही दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी गुन्हा क्रमांक १०१०/२०२६, कलम ३०३(२) बीएनएस अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सीसीटीव्ही फुटेजमधून आरोपीचा माग काढला

दोन्ही वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना कळमना पोलिसांनी परिसरातील २० ते २५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासले. तसेच गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयिताचा शोध घेण्यात आला. १९ नोव्हेंबर रोजी पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांना संशयित आरोपीबाबत महत्त्वाची माहिती मिळाली.

त्यानुसार पोलिसांनी कारवाई करून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान त्याच्याकडून काळ्या रंगाची स्प्लेंडर दुचाकी हस्तगत करण्यात आली. अधिक चौकशी केली असता त्याने दुसरी लाल रंगाची हिरो होंडा दुचाकीही चोरी केल्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. त्यानंतर दोन्ही दुचाकी जप्त करण्यात आल्या. या कारवाईत एकूण ४५ हजार रुपये किमतीचा चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

अटक आरोपीचे नाव

पोलिसांनी अटक केलेल्या आरोपीचे नाव शोएब खान उर्फ बद्दल ताजमुल खान (वय २२) असे असून, तो पर्वतीनगर, युवराज किराणा समोरील गल्ली, कविटाच्या झाडासमोर, कळमना, नागपूर शहर येथील रहिवासी आहे.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई

ही कारवाई पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंगल यांच्या मार्गदर्शनाखाली, सहपोलिस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, दक्षिण प्रादेशिक विभागाचे पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर आणि कळमना विभागाचे सहायक पोलिस आयुक्त रोहित ओक यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

या तपासात वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रवीण काळे, पोलिस निरीक्षक करिम पठाण, तपास पथक प्रमुख सपोनि अजय जाधव तसेच तपास पथकातील कर्मचारी पो.हवा. रविकुमार शाहू, पो.हवा. प्रदीप पवार, पो.अं. मंगेश लोहारी, पो.अं. संतोष पांडे, पो.अं. अनिल जाधव आणि पो.अं. प्रफुल गोहोकार यांनी सहभाग घेतला.

कळमना पोलिसांच्या या कारवाईमुळे वाहनचोरीचे दोन गुन्हे उघडकीस आले असून, चोरीच्या दुचाकींची विक्री करण्यापूर्वीच पोलिसांनी त्या हस्तगत केल्या आहेत.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button