AMCActionAmravaticitynewslatestnewss breakingnews

महापौरांच्या प्रभागातीलच रस्ता बनला जीवघेणा!

ज्ञानमाता हायस्कूल ते बसस्थानक मार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य; घनकचरा आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त, सीमा जाजोदिया यांनी मांडल्या नागरिकांच्या व्यथा!

अमरावती | प्रतिनिधी

अमरावती शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या बसस्थानक परिसरातील फ्रूट गल्लीकडे जाणारा रस्ता सध्या नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. ज्ञानमाता हायस्कूलजवळून बसस्थानकाकडे जाणाऱ्या या प्रमुख मार्गावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, रस्त्यावर घनकचरा आणि घाण साचल्याने परिसरात अस्वच्छतेचे चित्र निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, हा रस्ता महापौर श्रीचंद तेजवानी यांच्या प्रभागातील असल्याने परिसरातील मूलभूत सुविधांबाबत नागरिकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहेत.

या मार्गावरून दररोज मोठ्या संख्येने नागरिक, विद्यार्थी, वाहनचालक आणि पादचारी ये-जा करतात. मात्र, रस्त्याची दुरवस्था आणि जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. रस्त्यावर खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये रस्ता शोधावा लागतो, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. दुचाकीस्वारांना खड्डे चुकवताना अपघाताचा धोका निर्माण होत असून, पादचाऱ्यांनाही जीव मुठीत धरून या मार्गावरून चालावे लागत आहे.

रस्त्याच्या समस्येबरोबरच परिसरातील अस्वच्छतेनेही नागरिकांचे हाल होत आहेत. रस्त्याच्या कडेला आणि मार्गावर घनकचरा साचलेला असून, सर्वत्र घाण पसरल्याने दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांना नाक बंद करून मार्गक्रमण करावे लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शाळेजवळील परिसरातच अशी अस्वच्छता असल्याने विद्यार्थ्यांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.

दरम्यान, परिसरातील नागरिकांनी आपल्या समस्या आणि व्यथा सिटी न्यूजकडे मांडल्या. शहराच्या हृदयस्थानी असलेल्या आणि महापौरांच्या प्रभागातील प्रमुख रस्त्याची अशी अवस्था असेल, तर शहरातील इतर भागांतील रस्त्यांची परिस्थिती काय असेल, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

महापौरांच्या प्रभागातीलच या मुख्य मार्गाची दुरवस्था प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. केवळ स्वच्छतेच्या घोषणा आणि विकासाच्या आश्वासनांपेक्षा प्रत्यक्ष रस्त्यांची दुरुस्ती, नियमित कचरा उचलणे आणि परिसराची स्वच्छता राखणे आवश्यक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.

आता तरी महापौर आणि महानगरपालिका प्रशासनाने या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन ज्ञानमाता हायस्कूल ते बसस्थानक मार्गाची तातडीने दुरुस्ती करावी, तसेच परिसरातील घनकचरा हटवून नियमित स्वच्छतेची व्यवस्था करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button