AmravatiAmravati Gramincitynewslatestnewss breakingnewsShegaon

गणगण गणात बोतेच्या जयघोषाने बडनेरा दुमदुमले; गजानन भक्तीचा जागर!

शेगाव पायदळ वारी व पालखी दिंडीचे बडनेऱ्यात आगमन; स्वयंभू जगदंबा मरीमाता देवस्थान ट्रस्टतर्फे वारकऱ्यांचा सन्मान, फराळाची व्यवस्था

बडनेरा | प्रतिनिधी

‘गणगण गणात बोते’ आणि ‘श्री गजानन महाराज की जय’च्या जयघोषाने बडनेरा शहरातील जुनी वस्ती परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. श्री गजानन महाराजांच्या भक्तीने भारावलेल्या वातावरणात बडनेरा ते शेगाव पायदळ वारी व पालखी दिंडीचे आगमन झाले. यावेळी टाळ-मृदंगाचा गजर, भजन आणि महाराजांच्या नामस्मरणाने परिसर अक्षरशः गजाननमय झाला होता. पालखीच्या स्वागतासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून श्रींचे दर्शन घेतले.

श्री गजानन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट, माळीपुरा, जुनी वस्ती, बडनेरा यांच्या वतीने या पायदळ वारी व पालखी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. शेगावच्या दिशेने श्रद्धा आणि भक्तिभावाने मार्गक्रमण केलेल्या या वारीचे बडनेरा येथे आगमन होताच भाविकांनी उत्साहात स्वागत केले. रेल्वे स्थानक परिसरातून पालखीचे आगमन झाल्यानंतर माता फैल आणि जुनी वस्ती परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले. ठिकठिकाणी नागरिकांनी पालखीचे दर्शन घेत श्री गजानन महाराजांच्या चरणी नतमस्तक होत श्रद्धा व्यक्त केली.

या धार्मिक सोहळ्यानिमित्त जुनी वस्ती परिसरातील स्वयंभू जगदंबा मरीमाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने वारकऱ्यांच्या स्वागतासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली होती. ट्रस्टचे अध्यक्ष भुरू ऊर्फ राजेंद्र मारवे यांच्या पुढाकारातून पालखी दिंडीतील वारकऱ्यांचा नारळ व दुपट्टा देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पायदळ वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांसाठी फराळाची व्यवस्था करण्यात आली. वारकऱ्यांची सेवा करण्याच्या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे उपस्थित भाविकांकडून कौतुक करण्यात आले.

श्री गजानन महाराजांच्या नामाचा अखंड गजर करीत पायदळ वारीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर भक्तीभाव आणि समाधान दिसून येत होते. धार्मिक श्रद्धेसोबतच सेवाभाव, सामाजिक एकोपा आणि परस्पर सहकार्याची भावना या उपक्रमातून अधोरेखित झाली. वारकऱ्यांचा सन्मान करून त्यांच्यासाठी फराळाची व्यवस्था केल्याने स्वयंभू जगदंबा मरीमाता देवस्थान ट्रस्टच्या वतीने भक्तिसेवेचा सुंदर आदर्श यावेळी घालून देण्यात आला.

या धार्मिक उपक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून समाजसेवक संदीप कांबळे आणि नगरसेवक नाना आमले उपस्थित होते. यावेळी स्वयंभू जगदंबा मरीमाता देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष भुरूभाऊ मारवे यांच्यासह संतोष पसेरकर, संजय करिहार, किरण अंबाळकर, गणपत ऊसरे, कुणाल करिहार, भोलाभैया ऊसरे, रणजीत ऊसरे, पापा संकेते, कैलास संकेते, मधुकर निकोरे, चौधरी आदींनी कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी विशेष परिश्रम घेतले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button