सावनेर परिसरात भीषण अपघात; १९ वर्षीय वैभवचा दुर्दैवी मृत्यू!

अज्ञात वाहनाच्या धडकेत खानगाव येथील युवक गंभीर जखमी; रुग्णालयात नेताच डॉक्टरांनी केले मृत घोषित, परिसरात हळहळ
सावनेर | प्रतिनिधी
सावनेर परिसरात १८ नोव्हेंबर २०२६ रोजी रात्री ८ ते ८.१० वाजताच्या सुमारास भीषण अपघात घडला. सावनेर येथून आपल्या खानगाव या गावी मोटारसायकलने जात असलेल्या १९ वर्षीय युवकाला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात वैभव इंद्रजित मनोरे (वय १९, रा. खानगाव) हा गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर मृत घोषित केले.

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव मनोरे हा कामानिमित्त सावनेर येथे आला होता. काम आटोपल्यानंतर तो आपल्या MH40 DH 2885 क्रमांकाच्या मोटारसायकलने खानगावकडे रवाना झाला. दरम्यान, सावनेर परिसरात त्याच्या मोटारसायकलला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. धडकेची तीव्रता अधिक असल्याने वैभव गंभीर जखमी झाला.
अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून हितज्योती आधार फाउंडेशनच्या रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी वैभवला सावनेर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
यानंतर वैभवचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला. या अपघातप्रकरणी सावनेर पोलीस पुढील तपास करीत असून, धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचे काम सुरू आहे.



