उमरेडच्या सृष्टीची विश्वविक्रमी भरारी! अवघ्या ६.८६ सेकंदांत ५० मीटर लिंबो स्केटिंग

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नावाची नोंद; स्केटिंगमध्ये आतापर्यंत १२ विश्वविक्रम, ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानासाठी समर्पित केली विक्रमी कामगिरी
नागपूर | प्रतिनिधी
जिद्द, मेहनत आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर उमरेडच्या कन्येने जागतिक स्तरावर महाराष्ट्राचा गौरव वाढवला आहे. नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथील युवा स्केटिंगपटू सृष्टी धर्मेंद्र शर्मा हिने लिंबो स्केटिंग प्रकारात अवघ्या ६.८६ सेकंदांत ५० मीटरचे अंतर पूर्ण करून विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. तिच्या या असामान्य कामगिरीची गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्समध्ये नोंद झाली असून, संपूर्ण जिल्ह्यातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

सृष्टीने ८ ऑक्टोबर २०२६ रोजी उमरेड-सेव रोड येथे हा विक्रम प्रस्थापित केला. या विक्रमासाठी ५० मीटरच्या अंतरावर वेगवेगळ्या उंचीचे एकूण ५१ पोल उभारण्यात आले होते. सुरुवातीला ७० सेंटीमीटर उंचीचे १० पोल, त्यानंतर ६० सेंटीमीटरचे १०, ५० सेंटीमीटरचे १०, ४० सेंटीमीटरचे १० आणि शेवटी अवघ्या ३० सेंटीमीटर उंचीचे ११ पोल लावण्यात आले होते. या सर्व पोलखालून शरीराचा समतोल राखत वेगाने मार्गक्रमण करणे हे अत्यंत कठीण आव्हान होते.
साधारण एक मीटरच्या अंतरावर उभारलेल्या या पोलखालून सृष्टीने अवघ्या ६.८६ सेकंदांत ५० मीटरचे अंतर पूर्ण केले. संपूर्ण वेळेची नोंद इलेक्ट्रॉनिक डिजिटल सेन्सर टायमिंग मशीनद्वारे करण्यात आली. सिद्धी रोलर स्केटिंग अकादमीच्या आयोजनातून हा विक्रम साकारण्यात आला.
विशेष म्हणजे, सृष्टीने आपली ही विश्वविक्रमी कामगिरी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाला समर्पित केली आहे. तसेच ‘मी विरुद्ध मी’ (Me VS Me) या संकल्पनेतून स्वतःलाच आव्हान देत स्वतःची क्षमता सिद्ध करण्याचा प्रयत्न केला आहे. लिंबो स्केटिंगमध्ये शरीर जमिनीच्या अगदी जवळ ठेवून कमी उंचीच्या पोलखालून वेगाने जाताना संतुलन, एकाग्रता आणि अचूकता यांचा कस लागतो. या सर्व आव्हानांवर मात करत सृष्टीने जागतिक विक्रमाची नोंद केली.
१२ विश्वविक्रमांची मालिका; १२ वर्षांपासून मुलींच्या सक्षमीकरणाचा संदेश!
आपल्या यशाबद्दल सृष्टीने सांगितले की, गेल्या १२ वर्षांपासून ती लिंबो स्केटिंगच्या माध्यमातून ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ अभियानाचा प्रचार करत आहे. स्केटिंग हा तिच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनला आहे. मात्र, खेळासोबत शिक्षणालाही तितकेच महत्त्व देत तिने दोन्ही क्षेत्रांमध्ये समतोल राखण्याचा प्रयत्न केला. या संपूर्ण प्रवासात कुटुंबीयांनी दिलेले प्रोत्साहन आणि पाठबळ तिच्यासाठी अत्यंत मोलाचे ठरले.
सृष्टीचे वडील धर्मेंद्र शर्मा यांनीही तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. सृष्टीने मिळवलेले यश केवळ कुटुंबासाठीच नव्हे, तर देशासाठी अभिमानाची बाब असल्याचे त्यांनी सांगितले. आतापर्यंत सृष्टीने स्केटिंगमध्ये तब्बल १२ विश्वविक्रम प्रस्थापित केले असून, प्रत्येक विक्रमामागे तिची मेहनत, जिद्द आणि सातत्य असल्याचे त्यांनी नमूद केले.
एमबीबीएसचे शिक्षण आणि स्केटिंगचा सराव एकाच वेळी!
सृष्टीच्या यशाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे ती सध्या एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचे शिक्षण घेत आहे. वैद्यकीय शिक्षणाचा अभ्यास आणि स्केटिंगचा नियमित सराव या दोन्ही जबाबदाऱ्या ती यशस्वीपणे सांभाळत आहे. वेळेचे योग्य नियोजन, कठोर मेहनत आणि कुटुंबीयांचे सहकार्य यामुळे तिला हे शक्य झाले आहे.
खेळ आणि शिक्षण या दोन्ही क्षेत्रांत आपली क्षमता सिद्ध करणाऱ्या सृष्टी शर्माने पुन्हा एकदा मुली कोणत्याही क्षेत्रात मागे नाहीत, हे आपल्या कामगिरीतून दाखवून दिले आहे. उमरेडच्या या कन्येची विश्वविक्रमी भरारी आज अनेक तरुणींसाठी प्रेरणादायी ठरत आहे.



