नवजात बालकांच्या कथित तस्करी प्रकरणात महापालिकेतील बोगस जन्म प्रमाणपत्रांचा पर्दाफाश!

अन्य ठिकाणी जन्मलेल्या बाळाची भोजने हॉस्पिटलमध्ये प्रसूती दाखवून जन्म नोंदणी; निर्मल सरदारला अटक, २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
अमरावती | प्रतिनिधी
अमरावतीतील नवजात बालकांच्या कथित तस्करी प्रकरणात दिवसेंदिवस धक्कादायक खुलासे समोर येत असून, आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट महापालिकेच्या जन्म-मृत्यू नोंदणी विभागापर्यंत पोहोचल्याचे तपासात उघड झाले आहे. अन्य ठिकाणी जन्मलेल्या नवजात बालकाची प्रसूती डॉ. वैशाली भोजने यांच्या हॉस्पिटलमध्ये झाल्याचे दाखवून अमरावती महापालिकेतून बोगस जन्म प्रमाणपत्र तयार करण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी फ्रेजरपुरा पोलिसांनी निर्मल हिंमत सरदार (वय ५०, रा. मंगलधाम कॉलनी, अमरावती) याला अटक केली असून, न्यायालयाने त्याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे या कथित रॅकेटमध्ये महापालिकेतील आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानवी तस्करीच्या या प्रकरणातील मुख्य आरोपी डॉ. वैशाली भोजने हिने गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये वर्धा येथील एका दाम्पत्याला नवजात बालक विकल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, संबंधित बालकाचा जन्म अन्य ठिकाणी झाला असतानाही त्याची प्रसूती भोजने यांच्या मॅटर्निटी होममध्ये झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले. याच नोंदीच्या आधारे अमरावती महापालिकेतून जन्म प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. त्यामुळे महापालिकेतील जन्म नोंदणी प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
या प्रकरणात अटक करण्यात आलेला निर्मल सरदार हा खासगी प्रयोगशाळेसाठी रक्ताचे नमुने संकलित करण्याचे काम करीत असल्याची माहिती आहे. त्यानेच संबंधित नवजात बालक डॉ. वैशाली भोजने यांच्याकडे आणल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर बाळ स्वीकारणाऱ्या दाम्पत्याच्या नावाने भोजने हॉस्पिटलमध्ये प्रसूती झाल्याची नोंद तयार करून जन्म प्रमाणपत्र मिळविण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणेला आहे. या संपूर्ण प्रक्रियेत आणखी कोणाची मदत घेण्यात आली, याचा तपास सुरू आहे.
२०१४ मधील प्रकरणाचीही कबुली; तपासाची व्याप्ती वाढली
दरम्यान, या प्रकरणात आणखी एक महत्त्वपूर्ण खुलासा समोर आला आहे. सन २०१४ मध्ये व्हीएमव्ही परिसरातील एका महिला डॉक्टरच्या मध्यस्थीने नवजात बालक एका दाम्पत्याला दिल्याची कबुली डॉ. वैशाली भोजने हिने दिल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेला आता सुमारे १२ वर्षे झाली असून, संबंधित बालक सध्या किशोरवयात असण्याची शक्यता आहे.
या बालकाची ओळख सार्वजनिक होऊ नये, तसेच त्याच्या आणि संबंधित कुटुंबीयांच्या आयुष्यावर सामाजिक परिणाम होऊ नये, यासाठी पोलीस तपासात विशेष गोपनीयता पाळली जात आहे. या जुन्या प्रकरणाचा सध्याच्या कथित तस्करी प्रकरणाशी नेमका काय संबंध आहे, याचाही शोध घेतला जात आहे.
महापालिकेतील कोणाचा सहभाग? पोलिसांकडून चौकशी
बोगस जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी महापालिकेतील जन्म नोंदणी प्रक्रियेचा वापर झाल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनातील संभाव्य सहभागाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. संबंधित जन्म नोंदणी कोणी केली, कोणत्या कागदपत्रांच्या आधारे प्रमाणपत्र जारी करण्यात आले आणि या प्रक्रियेत महापालिकेतील कोणत्या अधिकारी किंवा कर्मचाऱ्याची मदत घेण्यात आली का, या दिशेने फ्रेजरपुरा पोलीस तपास करीत आहेत.
निर्मल सरदार याने यापूर्वीही अशा प्रकारे बालकांच्या कथित हस्तांतरणात मध्यस्थी केली होती का, आतापर्यंत किती बालकांना अशा पद्धतीने दाम्पत्यांकडे सोपविण्यात आले आणि संबंधित बालके नेमकी कुठून आणली जात होती, याबाबत पोलिसांकडून माहिती संकलित केली जात आहे. या प्रकरणामागे मोठी आरोपींची साखळी सक्रिय आहे का आणि रॅकेटचे इतर राज्यांतील टोळ्यांशी काही संबंध आहेत का, याचाही तपास सुरू आहे.
आरोपी पाचवा; न्यायालयाकडून २१ नोव्हेंबरपर्यंत कोठडी
निर्मल सरदार हा या प्रकरणातील पाचवा आरोपी ठरला आहे. त्याच्याकडून या कथित रॅकेटमधील इतर सहभागी व्यक्तींची माहिती मिळविणे, बोगस जन्म प्रमाणपत्र तयार करण्यासाठी वापरण्यात आलेली कागदपत्रे आणि त्यामागील संपूर्ण प्रक्रिया उघड करणे, या दृष्टीने पोलिसांना तपास करायचा आहे.
सरकारी पक्षातर्फे अॅड. प्रफुल्ल तापडिया यांनी आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली. त्यानंतर जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक ६ रामटेके यांच्या न्यायालयाने निर्मल सरदार याला २१ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली.



