दिवाळीच्या गर्दीत नियम मोडणाऱ्या खासगी बसचालकांवर आरटीओचा दणका; १७ दिवसांत १६.४८ लाखांचा दंड वसूल!

अमरावती आरटीओच्या सहा भरारी पथकांची धडक मोहीम; अवाजवी भाडे आकारणी करणाऱ्या ७९, अनधिकृत मालवाहतूक करणाऱ्या ८२ बसेसवर कारवाई
अमरावती | प्रतिनिधी
दिवाळीच्या सणासुदीच्या काळात प्रवाशांच्या वाढत्या गर्दीचा फायदा घेत अवाजवी भाडे आकारणाऱ्या आणि वाहतुकीचे नियम धाब्यावर बसविणाऱ्या खासगी बसचालकांविरोधात अमरावती प्रादेशिक परिवहन कार्यालयाने (आरटीओ) धडक मोहीम राबविली. या विशेष मोहिमेत आरटीओच्या सहा भरारी पथकांनी अवघ्या १७ दिवसांत तब्बल १ हजार २९० खासगी बसेसची तपासणी केली. त्यापैकी २८४ बसेसमध्ये विविध नियमांचे उल्लंघन आढळून आल्याने संबंधित वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईतून तब्बल १६ लाख ४८ हजार ६२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

दिवाळीच्या काळात मोठ्या संख्येने नागरिक प्रवासासाठी बाहेर पडतात. या गर्दीचा गैरफायदा घेत काही खासगी बसचालकांकडून निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारले जाते. तसेच प्रवासी वाहतुकीसाठी असलेल्या बसमधून अनधिकृतपणे मालवाहतूक केली जाते. अशा प्रकारांमुळे प्रवाशांची आर्थिक लूट होण्यासोबतच त्यांच्या सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण होतो. ही बाब लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी विशेष तपासणी मोहिमेचे नियोजन केले.

१ नोव्हेंबर ते १७ नोव्हेंबर या कालावधीत सहा भरारी पथकांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात आली. या दरम्यान निर्धारित दरापेक्षा अधिक भाडे आकारणाऱ्या ७९ खासगी बसेसवर कारवाई करण्यात आली. अनधिकृत मालवाहतूक करणाऱ्या ८२ बसेसही तपासणीत दोषी आढळल्या. याशिवाय मोटार वाहन कायद्याच्या विविध नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अन्य १२३ खासगी बसेसवरही दंडात्मक कारवाईचा बडगा उगारण्यात आला.

एकूण १ हजार २९० खासगी बसेसची तपासणी करण्यात आली असता २८४ वाहने नियमभंग करताना आढळली. संबंधित वाहनांवर मोटार वाहन कायद्यातील विविध तरतुदींनुसार कारवाई करून १६ लाख ४८ हजार ६२० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. प्रवाशांची आर्थिक लूट रोखणे, क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक टाळणे, वाहनांची नियमबद्धता तपासणे आणि रस्ते सुरक्षेला प्राधान्य देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.
नियम मोडणाऱ्यांची गय केली जाणार नाही – उर्मिला पवार
यासंदर्भात प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार यांनी सांगितले की, सणासुदीच्या काळात प्रवाशांची संख्या वाढत असताना त्यांच्या अडचणींचा गैरफायदा घेऊन अवाजवी भाडे आकारणे किंवा वाहनांमध्ये क्षमतेपेक्षा अधिक मालवाहतूक करणे हे गंभीर प्रकार आहेत. अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी परिवहन विभागाने विशेष तपासणी मोहीम राबविली. प्रवाशांची सुरक्षितता आणि हितरक्षण हे परिवहन विभागाचे प्राधान्य असून, मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
सहा भरारी पथकांची उल्लेखनीय कामगिरी
प्रादेशिक परिवहन अधिकारी उर्मिला पवार आणि उपप्रादेशिक परिवहन अधिकारी नंदकिशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहा भरारी पथकांनी ही मोहीम यशस्वी केली. वाहनांची प्रत्यक्ष तपासणी, नियमभंगाची पडताळणी आणि नियमानुसार दंडात्मक कारवाई करण्याची जबाबदारी पथकांनी पार पाडली.
या मोहिमेत मोटार वाहन निरीक्षक सचिन दळवी, कुणाल कुथे, अभिजीत खाडे, निखिल गायकवाड, सुरज मून तसेच सहायक मोटार वाहन निरीक्षक कांचन जाधव, अंकिता सराफ, श्रुतिका गोपीवार, दर्शना पिंपळकर आणि प्रशांत मालोकार यांनी सहभाग घेतला.
या विशेष मोहिमेची सविस्तर माहिती आणि आकडेवारी प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे जनसंपर्क अधिकारी अनिल मानकर यांनी दिली.
दिवाळीच्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांच्या हिताचे संरक्षण आणि रस्ते सुरक्षेसाठी अमरावती आरटीओने राबविलेली ही मोहीम महत्त्वपूर्ण ठरली आहे. अवाजवी भाडे आकारणी आणि अनधिकृत मालवाहतुकीविरोधात झालेल्या या कारवाईमुळे खासगी बस वाहतूकदारांमध्येही खळबळ उडाली असून, आगामी काळातही नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई सुरू राहणार असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.



