citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; पतीकडून दारूच्या नशेत मारहाण अन् चारित्र्यावर संशय

लग्नाआधी एक लाख, लग्नानंतर अडीच लाख रुपये घेतल्याचा आरोप; वाहन खरेदीसाठी आणखी ५० हजारांची मागणी, जरीपटका पोलिसांत गुन्हा दाखल

नागपूर : शहरातील जरीपटका पोलीस ठाण्याच्या हद्दीत विवाहित महिलेचा हुंड्यासाठी छळ केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. पतीकडून दारूच्या नशेत मारहाण करणे, पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेणे आणि वारंवार पैशांची मागणी करून मानसिक व शारीरिक त्रास देणे, असे आरोप पीडित महिलेने केले आहेत. लग्नापूर्वी एक लाख रुपये आणि लग्नानंतर अडीच लाख रुपये घेतल्याचेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकरणी जरीपटका पोलिसांनी पतीविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे २०२५ मध्ये संबंधित व्यक्तीसोबत विवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर काही काळातच पती-पत्नीमध्ये वाद सुरू झाले. पती दारू पिऊन घरी आल्यानंतर पत्नीला त्रास देत असे. तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन क्षुल्लक कारणांवरून वाद घालत मारहाणही करत असल्याचा आरोप महिलेने तक्रारीत केला आहे.

सततच्या त्रासाला कंटाळून पीडित महिलेने यापूर्वीही पोलीस ठाणे आणि भरोसा सेलमध्ये तक्रार दाखल करून पाठपुरावा केला होता. मात्र, पतीच्या वागणुकीत कोणताही बदल झाला नसल्याने अखेर तिने पुन्हा जरीपटका पोलीस ठाण्यात धाव घेतली.

प्रसूतीच्या खर्चासाठी ठेवलेले पैसेही घेतल्याचा आरोप

या प्रकरणातील तक्रारीत आर्थिक छळाचेही गंभीर आरोप करण्यात आले आहेत. महिलेच्या प्रसूतीसाठी लागणाऱ्या खर्चाच्या उद्देशाने ती काम करत असलेल्या शूजच्या दुकानातून पतीने परस्पर २० हजार रुपये घेतल्याचे तक्रारीत नमूद आहे. याशिवाय स्वतःसाठी वाहन खरेदी करायचे असल्याचे सांगून पतीने आणखी ५० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे, लग्नापूर्वी महिलेच्या कुटुंबीयांकडून एक लाख रुपये, तर लग्नानंतर अडीच लाख रुपये घेतल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. यानंतरही पैशांसाठी वारंवार तगादा लावून पत्नीचा छळ सुरूच असल्याचा आरोप पीडितेने केला आहे.

या सर्व प्रकारांमुळे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागत असल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. अखेर तिच्या तक्रारीच्या आधारे जरीपटका पोलिसांनी अपराध क्रमांक ८२८/२६ अन्वये भारतीय न्याय संहितेच्या कलम ८५ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, यापूर्वी भरोसा सेलपर्यंत पोहोचलेल्या या प्रकरणात आता पोलिसांत गुन्हा दाखल झाल्याने पुढील तपासाला सुरुवात झाली आहे. महिलेने केलेल्या आरोपांची सत्यता तपासण्याचे काम जरीपटका पोलीस करीत आहेत.

बाईट : एपीआय पांडुरंग जाधव, जरीपटका पोलीस ठाणे

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button