citynewsMaharashtraNagpurNagpurPolice

नागपूर मेट्रोतील भरती प्रक्रियेवरून युवक काँग्रेस आक्रमक; मुख्यालयासमोर जोरदार आंदोलन!

भाजप पदाधिकाऱ्यांची मेट्रोमध्ये भरती होत असल्याचा युवक काँग्रेसचा आरोप; बेरोजगार तरुणांवर अन्याय होत असल्याचा दावा, आंदोलनापूर्वी पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचाही आरोप

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर मेट्रोमधील कथित भरती घोटाळ्याच्या मुद्द्यावरून युवक काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत नागपूर महा मेट्रोच्या मुख्यालयासमोर आंदोलन केले. मेट्रोच्या भरती प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याचा आरोप करत युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या भरती प्रक्रियेत भाजपच्या पदाधिकाऱ्यांना प्राधान्य देऊन त्यांची नियुक्ती केली जात असल्याचा गंभीर आरोप युवक काँग्रेसने केला आहे.

युवक काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, महा मेट्रोमध्ये विविध पदांवर करण्यात येणाऱ्या भरतीमध्ये स्थानिक भाजप नेत्यांच्या माध्यमातून पक्षाशी संबंधित पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. राजकीय ओळखीच्या आधारावर भरती होत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसने या प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. एकीकडे नागपूरसह विदर्भातील अनेक सुशिक्षित तरुण रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना दुसरीकडे राजकीय संबंधांच्या आधारे नियुक्त्या होत असल्यास हा बेरोजगार तरुणांवर अन्याय असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे.

या कथित प्रकारामुळे नोकरी मिळविण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या बेरोजगार युवकांचे मनोबल खच्ची होत असल्याचा दावाही युवक काँग्रेसने केला. मेट्रोसारख्या महत्त्वाच्या सार्वजनिक प्रकल्पातील भरती प्रक्रिया पारदर्शक आणि गुणवत्तेच्या आधारावर व्हावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

दरम्यान, आजच्या आंदोलनापूर्वी युवक काँग्रेसच्या काही पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचा आरोपही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. त्यामुळे भरती प्रक्रियेतील कथित अनियमिततेसोबतच आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेण्याच्या मुद्द्यावरूनही युवक काँग्रेसने नाराजी व्यक्त केली.

या आंदोलनात युवक काँग्रेसचे मेहुल अडवाणी आणि सागर चव्हाण यांनी सहभाग घेतला. त्यांनी मेट्रो भरती प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांची चौकशी करून भरतीबाबतची वस्तुस्थिती जनतेसमोर आणण्याची मागणी केली.

बाईट : मेहुल अडवाणी – युवक काँग्रेस

बाईट : सागर चव्हाण – युवक काँग्रेस

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button