दुष्काळाच्या झळांमध्ये धारणीतील शेतकऱ्यांना दिलासा; रब्बी हंगामासाठी सिंचनाचे आवर्तन सुरू!

धारणी सिंचन शाखेचा महत्त्वपूर्ण निर्णय; पहिल्या टप्प्यात १६ पैकी ७ तलावांमधून पाणी सोडले, आठवडाभरात उर्वरित तलावांनाही आवर्तन; २,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार
संदीप राऊत | धारणी प्रतिनिधी
राज्यात एकीकडे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली असून अनेक भागांतील जलसाठ्यांमध्ये मोठी घट झाली आहे. अशा परिस्थितीत धारणी तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. धारणी सिंचन शाखेमार्फत रब्बी हंगामासाठी सिंचनाचे आवर्तन सुरू करण्यात आले असून, पहिल्या टप्प्यात १६ पैकी ७ तलावांमधून पाणी सोडण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या मागणीनुसार पुढील आठवडाभरात उर्वरित ९ तलावांमधूनही पाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील इतर भागांमध्ये मोठ्या तलावांमधून रब्बी पिकांसाठी पाणी सोडण्यास जलसंपदा विभागाकडून नकार देण्यात आल्याचे चित्र असताना धारणी तालुक्यात पुरेसा जलसाठा उपलब्ध असल्याने शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी देणे शक्य झाले आहे. या निर्णयामुळे रब्बी हंगामातील पेरणी आणि पिकांच्या वाढीसाठी मोठा आधार मिळणार आहे.

२,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे नियोजन
धारणी सिंचन शाखेने यंदाच्या रब्बी हंगामासाठी जवळपास २,५०० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आणण्याचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. या नियोजनाचा लाभ तालुक्यातील सुमारे २,५०० शेतकऱ्यांना मिळणार आहे. उपलब्ध जलसाठ्याचा विचार करून पाण्याचे सूक्ष्म नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक लाभार्थी शेतकऱ्याला आवश्यकतेनुसार पाणी मिळावे, यासाठी सिंचन शाखा प्रयत्नशील आहे.
सध्या आपत्ती व्यवस्थापन कायदा लागू असल्याने जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार उपलब्ध पाणीसाठ्यातून पिण्याच्या पाण्यासाठी १० टक्के, तर गुरेढोरे व पशुधनासाठी ५ टक्के पाणी आरक्षित ठेवण्यात आले आहे. या आरक्षणानंतर उर्वरित पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करून सिंचनासाठी आवर्तन देण्यात येत आहे.
भूजल पातळी घटल्याने कालव्याच्या पाण्याला महत्त्व
यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिल्यामुळे दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. परिणामी जमिनीतील भूजल पातळी झपाट्याने खाली जात असून, शेतकऱ्यांसमोर विहिरी आणि कूपनलिका कोरड्या पडण्याची भीती निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत केवळ विहिरी आणि बोअरवेलवर अवलंबून राहणे शेतकऱ्यांसाठी कठीण होत आहे. त्यामुळे कालव्याद्वारे उपलब्ध होणारे सिंचनाचे पाणी रब्बी पिकांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
लाभक्षेत्रात कालवा सल्लागार बैठका
सिंचनाचे नियोजन प्रभावीपणे राबविण्यासाठी धारणी सिंचन शाखेच्या वतीने १६ प्रकल्पांच्या लाभक्षेत्रातील गावांमध्ये जाऊन कालवा सल्लागार बैठका घेण्यात आल्या आहेत. या बैठकांमध्ये शेतकऱ्यांशी रब्बी पिकांची पेरणी, पिकांची निवड, पाण्याचा योग्य वापर आणि उपलब्ध जलसाठ्याचे नियोजन याबाबत चर्चा करण्यात आली. शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या आहेत.
तसेच धरण, तलाव आणि कालव्यांमधून कुठेही पाणी वाया जाणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याचे निर्देश शाखाधिकाऱ्यांनी संबंधित यंत्रणेला दिले आहेत. शेतकऱ्यांनीही पाण्याचा काटकसरीने आणि गरजेनुसार वापर करावा, असे आवाहन सिंचन शाखेमार्फत करण्यात आले आहे.
तलावातील गाळ शेतकऱ्यांना मोफत उपलब्ध
धारणी तालुक्यातील काही तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. हा गाळ शेतीसाठी उपयुक्त ठरू शकतो. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतात टाकण्यासाठी गाळाची आवश्यकता आहे, अशा शेतकऱ्यांनी धरणातून हा गाळ विनामूल्य घेऊन जावा, असे आवाहन सिंचन शाखेने केले आहे. यामुळे एकीकडे शेतजमिनीची सुपीकता वाढण्यास मदत होईल, तर दुसरीकडे तलावांमधील गाळ कमी होऊन जलसाठवण क्षमतेत वाढ होण्यास हातभार लागेल.
उन्हाळ्यातील पाणीटंचाई टाळण्यासाठीही प्रयत्न
काही सिंचन प्रकल्पांच्या लगत असलेल्या गावांच्या पाणीपुरवठ्याचे स्रोत विहिरींवर अवलंबून आहेत. त्यामुळे रब्बी हंगामासाठी सिंचनाचे पाणी सोडताना संबंधित गावांमध्ये उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होणार नाही, याचीही काळजी सिंचन शाखेकडून घेतली जात आहे. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या बैठकीत वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांनुसार सिंचनाचे नियोजन व अंमलबजावणी सुरू असल्याचे शाखाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
नैसर्गिक दुष्काळाशी सामना करण्यासाठी केवळ प्रशासनाच्या प्रयत्नांवर अवलंबून न राहता नागरिकांनीही पाण्याचा अपव्यय टाळावा, उपलब्ध पाणीसाठ्याचे जतन करावे आणि शासनाच्या पाणी बचत मोहिमेला सहकार्य करावे, असे आवाहन धारणी सिंचन शाखेचे शाखाधिकारी सचिन श्री. पाल यांनी केले आहे.
— सचिन श्री. पाल, शाखाधिकारी, सिंचन शाखा, धारणी



