citynewsMaharashtraNagpurNagpurCrimeNagpurPolice

नागपुरात प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त; ५२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत!

सीताबर्डी पोलिसांची AHTU व SSB पथकासह कारवाई; लाहोरी डिलक्स इमारतीतील आर. के. ट्रेडर्सवर छापा, दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल

नागपूर | प्रतिनिधी

नागपूर शहरात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत AHTU आणि SSB पथकाने संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित गुटख्याचा साठा जप्त केला. या कारवाईत तब्बल ५२ हजार २४० रुपये किमतीचा विविध कंपन्यांचा गुटखा हस्तगत करण्यात आला असून, याप्रकरणी एका दुकानदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वेस्ट हायकोर्ट रोडवरील कॅफे हाऊ चौक परिसरातील लाहोरी डिलक्स बिल्डिंगमध्ये असलेल्या आर. के. ट्रेडर्स या दुकानात प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूची विक्री होत असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे AHTU व SSB पथकाने पंच आणि पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित दुकान परिसरात सापळा रचला.

यावेळी दुकानात ग्राहकांना विक्री करण्याच्या उद्देशाने शासनाने प्रतिबंधित केलेल्या विविध कंपन्यांच्या गुटख्याचा साठा करून ठेवल्याचे आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी अन्न व औषध सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलावून कायदेशीर पंचनामा करण्याची विनंती केली. अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाचा पंचनामा केला.

या कारवाईत पोलिसांनी ५२ हजार २४० रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. याप्रकरणी दीपक पांडुरंग चव्हाण (वय ३०, रा. क्वार्टर क्रमांक १५३, कलामंदिरजवळ, मोतीबाग, नागपूर) याच्याविरुद्ध सीताबर्डी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १२३, २७४, २७५ तसेच अन्नसुरक्षा व मानके अधिनियम २००६ मधील कलम २६(२)(i) आणि २६(२)(iv) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जप्त करण्यात आलेला मुद्देमाल आणि आरोपीला वैद्यकीय तपासणीनंतर पुढील कायदेशीर कारवाईसाठी सीताबर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.

प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थांची साठवणूक व विक्री करणाऱ्यांविरोधात पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे अवैध विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक दर्शन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली AHTU व SSB पथकाने केली.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button