citynewsCrime NewsWashim

तोंडगाव टोल प्लाझा व्यवस्थापकाविरोधात जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

टोल वसुलीतील कथित गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेतल्याचा आरोप; प्रामाणिक कर्मचाऱ्यांना कारवाईच्या धमक्या दिल्याची तक्रार

वाशिम : जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझा येथील व्यवस्थापनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी तक्रार जिल्हाधिकारी तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे करण्यात आली आहे. टोल वसुलीत कथित गैरव्यवहार केल्याप्रकरणी पोलिसांत गुन्हे दाखल झाल्यानंतर कामावरून कमी करण्यात आलेल्या काही कर्मचाऱ्यांना टोल प्लाझा व्यवस्थापकांनी पुन्हा सेवेत घेतल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर संबंधित कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली असून, इतर कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याच्या धमक्या दिल्या जात असल्याचेही तक्रारदारांनी म्हटले आहे.

तक्रारीनुसार, टोल वसुलीतील गैरव्यवहाराच्या आरोपांवरून यापूर्वी काही कर्मचाऱ्यांविरोधात पोलिसांत गुन्हे दाखल झाले होते. त्यानंतर त्यांना कामावरून कमी करण्यात आले होते. मात्र, आता त्याच कर्मचाऱ्यांना पुन्हा कामावर घेण्यात आल्याचा आरोप आहे. या निर्णयामुळे टोल प्लाझामधील इतर कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी निर्माण झाली असून, प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर कारवाईचा दबाव आणला जात असल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे.

या पार्श्वभूमीवर, गुन्हे दाखल असलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांना तातडीने कामावरून कमी करावे, टोल प्लाझामधील सीसीटीव्ही फुटेज तपासून टोल वसुलीतील कथित गैरव्यवहाराची सखोल चौकशी करावी आणि या संपूर्ण प्रकरणात संबंधित व्यवस्थापकाची भूमिका तपासून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

आता जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण या तक्रारीची दखल घेऊन काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, तक्रारीतील आरोपांबाबत टोल प्लाझा व्यवस्थापनाची अधिकृत बाजू समोर आलेली नाही.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button